ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी ७ जानेवारीपासून सिडनीत खेळवली जाणारमेलबर्न कसोटी जिंकून टीम इंडियाची मालिकेत १-१ अशी बरोबरीरोहित शर्माच्या आगमनानं टीम इंडियाच्या फलंदाजांची फळी मजबूत
India vs Australia, 3rd Test : मेलबर्नवरील विजयानंतर दोन दिवस विश्रांती करून टीम इंडियाचे खेळाडू पुन्हा नेट्समध्ये सरावाला उतरले. रोहित शर्मा ( Rohit Sharma) च्या आगमनानंतर टीम इंडियाची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. त्यामुळे ७ जानेवारीपासून सिडनी येथे तिसरी कसोटी सुरू होणार आहे आणि भारतीय संघ आत्मविश्वासानं भरलेला दिसत आहे. उमेश यादव ( Umesh Yadav) व मोहम्मद शमी ( Mohammed Shami) यांच्या जागी उर्वरित कसोटींसाठी टी नटराजन ( T Natarajan) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया आता सेटल वाटत असताना शनिवारी त्यांच्या चिंतेत भर टाकणारे दोन प्रसंग घडले.
चेतेश्वर पुजाराऐवजी उर्वरित कसोटींत सलामीवीर रोहितला पहिल्यांदा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार बनविण्यात आले आहे. नियमित कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर मायदेशी परतल्यामुळे अजिंक्य रहाणेकडे ( Ajinkya Rahane) काळजीवाहू कर्णधारपद आले होते. रोहित फिट होऊन संघात दाखल झाल्यास त्याच्याकडे उपकर्णधारपद दिले जाईल, असा निर्णय संघ व्यवस्थापनाने आधीच घेतला होता. या निर्णयाशी संबंधित बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने स्वत:चे नाव गुप्त राखण्याच्या अटीवर सांगितले की, विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यने कर्णधारपदाची धुरा सांभाळताच उपकर्णधारपदाबाबत कुठलीही शंका नव्हती. रोहित या जबाबदारीसाठी योग्य होता. तो फिट होईपर्यंत पुजाराकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.
रोहित ताफ्यात दाखल झाल्यानंतर तिसऱ्या कसोटीतील Playing XI ( अंतिम ११) साठी कोणाला बाहेर बसवले जाईल याची चर्चा सुरू आहे. मयांक अग्रवालला दोन्ही सामन्यात अपयश आले आहे. त्यात मधल्या फळीत हनुमा विहारीनंही निराश केलं आहे. त्यामुळे रोहित व लोकेश राहुल हे दोन बदल संघात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उमेश यादवच्या जागी अंतिम ११मध्ये कोणाला संधी मिळेल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. नेट बॉलर म्हणून संघात असलेल्या टी नटराजननं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वन डे व ट्वेंटी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता त्याचे कसोटी पदार्पणही होते का, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, तिसऱ्या कसोटीसाठी सराव करताना शनिवारी नेटमध्ये
चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि
पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यांना दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. चेतेश्वरच्या उजव्या हाताला मार लागला आणि त्यानं काही काळ सरावातून विश्रांती घेतली. पुजारा चांगल्या फॉर्मात नसला तरी मधल्या फळीत त्याची उपस्थिती संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. काही काळाच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा नेटमध्ये सराव करताना दिसला. दुसरीकडे पृथ्वीनंही प्राथमिक उपचार घेऊन पुन्हा सराव सुरू केला आहे. त्याला अंतिम ११मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. पुजारानं सराव केला असला तरी त्याची दुखापत फार गंभीर नसावी, अशी टीम इंडिया प्रार्थना करत आहे.
असा असेल संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार) , रोहित शर्मा ( उप कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान सहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, टी नटराजन.