Join us  

India vs Australia, 3rd T20I : मॅथ्यू वेड, ग्लेन मॅक्सवेलची दमदार फटकेबाजी, टीम इंडियाचे गचाळ क्षेत्ररक्षण

India vs Australia, 3rd T20I : कर्णधार विराट कोहलीनं तिसऱ्या व अंतिम सामन्यात संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर कोहलीनं ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

By स्वदेश घाणेकर | Published: December 08, 2020 3:29 PM

Open in App
ठळक मुद्देग्लेन मॅक्सवेलनं ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ५४ धावा केल्यामॅथ्यू वेडनं ५३ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारासह ८० धावा केल्या

India vs Australia, 3rd T20I : तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा दम दाखवला. मॅथ्यू वेड व ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं मोठा पल्ला गाठला. भारतीय खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचं पुन्हा एकदा दर्शन घडलं. मॅक्सवेलला दिलेले जीवदान संघाला मारक ठरले. 

आजच्या सामन्यात अॅरोन फिंचचे पुनरागमन झाले, परंतु वॉशिंग्टन सुंदरनं त्याला भोपळाही फोडू न देता दुसऱ्या षटकात माघारी जाण्यास भाग पाडले. ट्वेंटी-20 सामन्यांत भारताविरुद्ध सर्वाधिक ३ वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम फिंचनं नावावर केला. मॅथ्यू वेड व स्टीव्हन स्मिथ यांनी संयमी खेळ करत पहिल्या पॉवर प्लेमध्ये संघाला १ बाद ५१ धावांपर्यंत मजल मारून दिली. या दोघांची ६५ धावांची भागीदारी सुंदरनं तोडली. १०व्या षटकात स्मिथ २४ धावांवर माघारी परतला. पहिल्या दहा षटकांत सुंदरनं ४ षटके फेकली आणि ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. मॅथ्यू वेडनं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं ३४ चेंडूंत ५० धावा केल्या. भारताविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये तीन अर्धशतक झळकावणारा तो चौथा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. यापूर्वी कुमार संगकारा, ब्रेंडन मॅकलम आणि टीम सेईफर्ट यांनी ही कामगिरी केली आहे. वेड आणि ग्लेन मॅक्सवेल धुलाई करत होते आणि १३ व्या षटकात युजवेंद्र चहलनं मॅक्सवेलला झेलबादही केलं, परंतु पंचांनी तो नो बॉल दिला अन् मॅक्सवेलला जीवदान मिळाले. त्यानंतर संजू सॅमसनचे अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. मॅक्सवेलनं टोकावलेला चेंडू सीमारेषेपार जात होता, परंतु सॅमसननं हवेत झेपावत संघासाठी चार धावा वाचवल्या. चहलनं ४ षटकांत ४१ धावा दिल्या.

वेड व मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजी केली. त्यांना नशीबाचीही साथ लाभली. भारतीय खेळाडूंकडून झेल सोडण्याचे सत्र याही सामन्यात कायम राहिले. मॅक्सवेलनं ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. शार्दूल ठाकूरनं टीम इंडियासाठी महत्त्वाची विकेट टिपली. मॅक्सवेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करणाऱ्या वेडला त्यानं पायचीत केलं. वेडनं ५३ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारासह ८० धावा केल्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. याच षटकात मॅक्सवेलही बाद झाला असता, परंतु युजवेंद्र चहलनं त्याचा झेल सोडला. २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टी नटराजननं मॅस्कवेलचा त्रिफळा उडवला. मॅक्सवेलनं ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं २० षटकांत ५ बाद  १८६ धावा केल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाग्लेन मॅक्सवेल