Join us  

India vs Australia 3rd odi: कोहलीच्या शतकानंतरही भारताचा पराभव

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 313 धावा केल्या आणि या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे तीन तेरा वाजले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 9:12 PM

Open in App

रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीच्या शतकानंतरही भारताला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 32 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 313 धावा केल्या आणि या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे तीन तेरा वाजले. कोहलीने 123 धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला झटपट तीन धक्के बसले. त्यानंतर कोहली आणि महेंद्रिसिंग धोनी यांनी संघाला स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात धोनी 26 धावांवर बाद झाला. धोनी बाद झाल्यावर कोहलीने केदार जाधवबरोबर डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण केदार बाद झाल्याने हा प्रयत्नही अपयशी ठरला. कोहलीने 16 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 123 धावा केल्या. कोहलीचे हे 41वे शतक ठरले.

दमदार सलामीनंतरही ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 313 धावा करता आल्या. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीचा चांगलाच फायदा ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी उचलला. आरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांनी 193 धावांची सलामी दिली. पण कुलदीप यादवने फिंचला बाद करत ही जोडी फोडली. फिंचने 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 93 धावा केल्या. फिंचचे शतक हुकले असले तरी ख्वाजाने मात्र शतक पूर्ण केले. फिंचने 11 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 104 धावा केल्या. शतक झळकावल्यावर ख्वाजाला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. ख्वाजानंतर ग्लेन मॅक्सवेलचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे जवळपास दोनशे धावांची भागीदारी 32 षटकांमध्ये होऊनही ऑस्ट्रेलियाला 313 धावांपर्यंतच मजल मारता आली.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया