Join us

India vs Australia, 2nd Test : मी बाद झालो याचा विचार करू नकोस, बिनधास्त खेळ; रवींद्र जडेजाला अजिंक्यचा सल्ला 

India vs Australia, 2nd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीत पाहुण्यांनी विजयाच्या दिशेनं वाटचाल केली आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: December 28, 2020 13:49 IST

Open in App

India vs Australia, 2nd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीत पाहुण्यांनी विजयाच्या दिशेनं वाटचाल केली आहे. पहिल्या सत्रातील निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियाला पहिल्या डावात १३१ धावांचीच आघाडी घेता आली. कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज ३२ धावांत माघारी परतल्यानं टीम इंडियाला ३२६ धावांवर समाधान मानावे लागले. पण, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला बॅक फुटवर पाठवले. भारतानं दिवसअखेर ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज १३३ धावांवर माघारी परतले होते. ऑस्ट्रेलियाकडे नाममात्र २ धावांची आघाडी घेतली आहे. अजिंक्यच्या विकेटनं टीम इंडियाच्या डावाला कलाटणी दिली. रवींद्र जडेजाला( Ravindra Jadeja)  अजिंक्यच्या विकेटचे फार दुःख झाले होते. पण, कर्णधार अजिंक्यच्या दोन शब्दानं त्याचे मनोबल उंचावले. ७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. १०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अजिंक्यला माघारी जावं लागलं. अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. अजिंक्यनंतर मिचेल स्टार्कनं जडेजाला बाद केले. जडेजानं ५७ धावा केल्या. यानंतर टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला फार कष्ट घ्यावे लागले नाही. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

१०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याला माघारी जावं लागलं. नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर जडेजानं शॉर्ट कव्हरला फटका मारला आणि अर्धशतकीय धावेसाठी अजिंक्यला कॉल दिला. अजिंक्यनेही त्वरीत प्रतिसाद देताना धाव घेतली, पण मार्नस लाबुशेननं चेंडू यष्टिरक्षक टीम पेनकडे दिला. थोडक्यात अजिंक्य धावबाद झाला.  

या प्रसंगाबद्दल अजिंक्य म्हणाला,''मला सुरुवातीला वाटले की मी क्रिजमध्ये पोहोचलो आहे. पण, मी जडेजाला म्हणालो, माझ्या बाद होण्याचा जास्त विचार करू नकोस, चिंता करू नकोस आणि तू खेळतोस तसाच खेळत राहा. कर्णधारपद म्हणजे तुम्ही स्वतःला प्रेरणा देत राहा. आजच्या कामगिरीचे श्रेय गोलंदाजांचे, त्यांनी योग्य मारा केला.''

दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड ( ४०) आणि मार्नस लाबुशेन ( २८) यांनी संघर्ष केला. रवींद्र जडेजानं दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. उमेश यादव, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेरवींद्र जडेजा