ठळक मुद्देमोहम्मद सिराजचा 500 ते 2.6 कोटीपर्यंतचा प्रवासमोहम्मद सिराजचे वडील रिक्षा चालक
अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : अॅडलेडच्या वन डे सामन्यात भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. मालिकेतील आव्हान जीवंत राखण्यासाठी महत्त्वाच्या लढतीत भारताने हैदराबादच्या मोहम्मद सिराजला संधी दिली. दोन वर्षांपूर्वी सिराजने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते आणि मंगळवारी त्याने वन डे संघात स्थान पटकावले. भारतीय वन डे संघात पदार्पण करणारा मोहम्मद हा 225 वा खेळाडू आहे.
भारत A संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सिराजला वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले होते. मात्र, त्याला अंतिम अकरात स्थान पटकावता आले नाही. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय A संघाचा सिराज सदस्य होता. त्याने तेथे दमदार कामगिरी केली. त्यानंतर स्थानिक सामन्यांतही आपली छाप पाडल्यामुळे त्याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत निवडण्यात आले. ऑस्ट्रेलिया A संघाविरुद्धच्या एका सामन्यात त्याने दोन्ही डावांत मिळून ( 8/59 व 3/77 ) 11 विकेट घेतल्या होत्या. सिराजने 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-20 सामन्यात पदार्पण केले होते. त्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांकडून सिराजच्या गोलंदाजीची धुलाई केली होती.
हैदराबाद येथे 13 मार्च 1994 मध्ये सिराजचा जन्म झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काही ठिक नव्हती, तरीही कुटुंबीयांनी मोहम्मदचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बराच त्याग केला. त्याचे वडील रिक्षा चालक आहेत. टेनिस बॉलपासून क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या मोहम्मदला प्रशिक्षक फार उशीरा मिळाले. तोपर्यंत त्याने स्वतःच आपल्या खेळात सुधारणा केली. क्रिकेटमध्ये त्याने कमावलेली पहिली कमाई ही 500 रुपये होती.
एका स्थानिक सामन्यात त्याने 9 विकेट घेतल्या होत्या आणि त्यामुळे त्याला 500 रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. त्याच मोहम्मदला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज 2.6 कोटी रुपये मिळाले आहेत. सनरायझर्स हैदराबादने त्याला करारबद्ध केले. 2015-16 मध्ये मोहम्मदने रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. 2016-17च्या रणजी हंगामात सर्वाधिक 41 विकेट घेण्याचा मान मोहम्मदने पटकावला.