Join us  

India vs Australia 2nd ODI : तेंडुलकर, अझरूद्दीन यांना जमलं नाही ते कोहलीनं केलं

India vs Australia 2nd ODI : कर्णधार विराट कोहलीने अ‍ॅडलेड वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 4:26 PM

Open in App

अ‍ॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहलीने अ‍ॅडलेड वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. कोहलीने या खेळीसह वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये 11 वे स्थान पटकावले. त्याचे हे वन डेतील 39वे शतक ठरले. त्यासह त्याचे हे 64वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. मागील 19 वन डे सामन्यांतील कोहलीचे हे 9 वे शतक ठरले. याच विक्रमाबरोबर त्याने सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांना न जमलेला पराक्रम केला.ऑस्ट्रेलियाचा 298 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली.  दोघांनी पहिल्या विकेटसाठी 47 धावा जोडल्या. धवन ( 32) माघारी परतताच रोहितने कर्णधार विराट कोहलीसह भारताला शतकी उंबरठा ओलांडून दिला. रोहित-कोहलीची अर्धशतकी भागीदारी स्टॉयनिसने संपुष्टात आणली. रोहितला 43 धावांवर माघारी फिरावे लागले. त्यानंतर कोहलीने सामन्याची सूत्रे हाती घेतली आणि खणखणीत शतक झळकावले. कोहलीने 112 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 104 धावा केल्या. सामन्याच्या 44 व्या षटकात तो बाद झाला.शतकासह त्याने अनेक पराक्रम केले. ऑस्ट्रेलियात वन डे शतक ठोकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.  अझरुद्दीन आणि तेंडुलकर यांनाही कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात वन डे  शतक झळकावता आलेले नाही. अझरूद्दीनने 1992 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या 93 धावा ही भारतीय कर्णधाराची सर्वोत्तम खेळी होती. तेंडुलकरनेही 2000 मध्ये ऑस्ट्रेलियात पाकिस्तानविरुद्ध 93 धावा केल्या होत्या. या शतकासह त्याने श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा 63 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडला. त्याने धावांचा पाठलाग करताना 39 आंतरराष्ट्रीय शतक झळकावली आहेत. तेंडुलकरला 39 वन डे शतकांसाठी 350 डाव खेळावे लागले, तर कोहलीने 210 डावांमध्ये हा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियातील कोहलीचे हे पाचवे वन डे शतक ठरले. यासह त्याने रोहित शर्मा व कुमार संगकारा यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआयसचिन तेंडुलकर