पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि लोकेश राहुल यांच्याऐवजी अंतिम ११मध्ये पृथ्वी शॉला संधी दिल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले होते. पृथ्वीनंही अपयशाचा पाढा पुन्हा वाचला आणि मिचेल स्टार्कनं पहिल्याच षटकात त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. लंच ब्रेकपर्यंत भारताचे दोन फलंदाज ४१ धावांवर माघारी परतले होते. चेतेश्वर पुजारा व मयांक अग्रवाल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता, परंतु पॅट कमिन्सच्या एका अप्रतिम चेंडूनं मयांकचा त्रिफळा उडवला. तो ४० चेंडूंत २ चौकारासह १७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli)नं चेतेश्वर पुजारासह टीम इंडियाचा डाव सावरला. विराटनं यावेळी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा विक्रम मोडला.
३५व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट झेलबाद होता, परंतु यष्टिरक्षक टीम पेननं DRSनं घेतल्यानं त्याला जीवदान मिळालं. नॅथन लियॉननं टाकलेल्या चेंडूं तिसऱ्या यष्टींमागून बाहेर जात होता आणि तो विराटच्या ग्लोजला हलकासा घासून पेनच्या हाती विसावला. मॅथ्यू वेडनं DRS घेण्याची मागणी केली, परंतु पेननं तो घेतला नाही. रिप्लेत चेंडू विराटच्या ग्लोजला हलकासा घासल्याचे दिसले. ऑस्ट्रेलियानं मोठी विकेट गमावली. त्यानंतर विराट-पुजारा जोडीनं धावांची गती वाढवली. ऑस्ट्रेलियानं क्षेत्ररक्षण सैल केल्याचा फायदा दोघांनी उचलला आणि या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
१९१ चेंडूंतील ६८ धावांची भागीदारी ५०व्या षटकात संपुष्टात आली. नॅथनच्या गोलंदाजीवर गलीवर उभ्या असलेल्या मार्नस लाबुशेननं झेल टिपून पुजाराला माघारी जाण्यास भाग पाडले. मैदानावरील पंचांनी नाबाद देताच ऑसी संघानं DRSघेतला आणि त्यात चेंडू बॅटवर आदळल्याचे स्पष्ट दिसत होते. पुजारा १६० चेंडूंत २ चौकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. १४७ चेंडूंनंतर पुजारानं पहिला चौकार खेचला. पण, विराट एका बाजूनं टीम इंडियाचा डाव सावरून आहे. त्यानं या ३९ वी धाव घेताच महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) विक्रम मोडला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा आता विराटच्या नावावर जमा झाल्या आहेत.
Most runs in BGT Series by Indian captain
विराट कोहली - ८१६*
महेंद्रसिंग धोनी - ८१३
सौरव गांगुली - ४४९
मोहम्मद अझरुद्दीन - ३११
सचिन तेंडुलकर - २८८