ठळक मुद्देविराट कोहलीला साजेशी कामगिरी करता आली नाही. अव्वल चार फलंदाज अवघ्या 41 धावांवर माघारी कर्णधार विराट कोहली 3 धावांवर बाद
अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : अॅडलेड कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या कसोटीत तो केवळ तीन धावा बनवून तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने घेतलेल्या अप्रतिम झेलने कोहलीची खेळी संपुष्टात आणली. ख्वाजाच्या या सुपर डुपर कॅचने कोहलीलाही स्तब्ध केले. ख्वाजाने या कॅचसह भारताला मोठा धक्काच दिला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लोकेश राहुल बाद झाला. त्यापाठोपाठ मुरली विजयही ( 11) माघारी परतला. कर्णधार कोहली आणि चेतेश्वर पुजारा भारताचा डाव सांभाळतील असे वाटत होते. कोहलीकडून सर्वांना बऱ्याच अपेक्षा होत्या, परंतु पॅट कमिन्सच्या त्या षटकात तो बाद झाला आणि भारताची अडचण वाढली. कमिन्सच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह लगावण्याचा कोहलीने प्रयत्न केला आणि चेंडू हवेत राहिला. ख्वाजाने डावीकडे स्वतःला झोकून देत एका हाताने तो चेंडू टिपला आणि भारताला तिसरा धक्का दिला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी फार चांगली झालेली नाही. येथे भारताने 44 कसोटींत फक्त पाच सामने जिंकले आहेत. मागील 70 वर्षांत भारताने येथे 11 दौऱ्यांत केवळ दोन वेळा मालिका बरोबरीत सोडवली आहे. सुनील गावसकर आणि सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनुक्रमे 1980-81 व 2003-04 च्या दौऱ्यात मालिका बरोबरीत सोडवली होती.