ठळक मुद्देजवळपास दहा महिन्यांतर रोहित शर्माचे कसोटी पुनरागमनरोहित शर्माला केवळ 37 धावांवर माघारी फिरावे लागलेतरीही त्याने एक विक्रम नावावर केला
अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : जवळपास दहा महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या हिटमॅन रोहित शर्माला अॅडलेड कसोटीत केवळ 37 धावा करता आल्या. मात्र, त्याने या खेळीने निवड समिती आणि व्यवस्थापनाला सहाव्या क्रमांकाचा उत्तम पर्याय असल्याचे सिद्ध केले. या कसोटीत तो ज्या प्रकारे बाद झाला त्यावर टीका होत आहे. असे असले तरीही रोहितने या कसोटीत मोठा विक्रम नावावर केला. मागील वर्षांतही रोहितने हा पराक्रम केला होता.
रोहितने या वर्षाच्या सुरुवातीला सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात दहा आणि दुसऱ्या डावात 47 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले. या कालावधीत त्याने वन डे क्रिकेटमध्ये दमदार खेळी केली. याच कामगिरीच्या जोरावर त्याने कसोटी संघात पुनरागमन केले. अॅडलेडच्या पहिल्या दिवसाच्या खेळात त्याच्या फटकेबाजीत वन डेतील शैली पाहायला मिळाली.
रोहितने 61 चेंडूंत 37 धावा केल्या आणि त्यात दोन चौकार व तीन षटकारांचा समावेश होता. याशिवाय त्याने पाचव्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारासह 45 धावांची भागीदारी केली. रोहितला मोठी धावसंख्या उभारता आली नसली त्याने एक विक्रम नावावर केला. 2018 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितच्या नावावर जमा झाला आहे. 2017मध्येही त्याने एकूण 65 षटकार खेचून हा विक्रम केला होता. 2018 मध्ये त्याच्या नावावर 73 षटकार झाले आहेत.