ठळक मुद्देलोकेश राहुल पहिल्या कसोटीत अवघ्या दोन धावांवर माघारी कसोटी क्रिकेटमधील अपयशाचे सत्र कायमदक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध अपयशी
मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी जे घडायला नको होतं तेच घडलं. भारताचे आघाडीचे चार फलंदाज लंच ब्रेकपर्यंतही खेळपट्टीवर थांबू शकले नाही. मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे वगळता लोकेश राहुल आणि विराट कोहली यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. लोकेश राहुलचे अपयश हा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. एखाद्या वरदहस्तामुळे तुम्ही संघात स्थान टिकवू शकता,परंतु प्रत्यक्ष मैदानावर तुम्हालाच खेळ दाखवावा लागतो याचा विसर बहुदा राहुलला पडला असावा.
ॲडलेड कसोटीत राहुलला नशिबाने साथ दिली. पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाला नसता तर कदाचित ( कोण जाणे कोहलीने तरी त्यालाच खेळवले असते) राहुलला संधी मिळाली नसती. सराव सामन्यात पृथ्वीला झालेली दुखापत राहुलच्या फायद्याची ठरली आणि त्याने अंतिम 12 मध्ये स्थान पटकावलं. अंतिम अकरासाठी सलामीला रोहित शर्मा व विजय हा पर्याय ठेवून हनुमा विहारीला संधी देता आली असती, परंतु कोहलीने राहुलवरील प्रेम पुन्हा अधोरेखित केले. सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात कशाबशा पन्नास धावा करून राहुल संघात असायला हवे असे बोलण्याची संधी कोहलीला दिली.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सातत्याने अपयशी ठरुनही राहुल पाचही कसोटी खेळला. तेच शिखर धवन आणि मुरली विजय या दुसऱ्या सलामीवीरांना वेगळा न्याय देण्यात आला. विजयला तर तीन सामन्यानंतर संघातूनच डावलले. विजय या वागणूकीने खचला नाही, तर कौंटी क्रिकेटमध्ये खेळून खोऱ्याने धावा केल्या आणि सन्मानाने पुन्हा भारतीय संघात स्थान पटकावले. राहुलने असं काय केलं ? इंग्लंड दौऱ्यात शेवटच्या कसोटीत शतक झळकावून त्याने स्वतःची लाज राखली. पण त्याची ही खेळी 'तेलही गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे!' अशीच होती. त्याचा वैयक्तिक फायदा झाला, परंतु संघाचे हीत शून्य. राहुल गुणवान खेळाडू आहे, यात दुजाभाव नसला तरी त्याची सध्याची कामगिरी टीकेस पात्र आहे. भारताला सलामीचा प्रश्न नेहमी सतावत आला आहे. विशेषतः परदेश दौऱ्यावर तो प्रकर्षाने जाणवतो. अशा वेळी वारंवार संधी देउनही राहुल अपयशी ठरत असेल, तर मग त्याला पर्याय शोधायला हवा.
आणखी किती दिवस कोहली कृपेने राहुलला संधी मिळत राहिल या प्रश्नाचे उत्तर देणं अवघड आहे. पण भारतीय क्रिकेटमध्ये पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. आता संघातील प्रत्येक स्थानासाठी भरपूर पर्याय आहेत. प्रत्येक जागेसाठीची वेटिंग लिस्ट ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे तुम्ही कामगिरी करा अन्यथा बाहेर बसा. कोहलीच्या आरक्षण पॉलिसीमुळे राहुलला आता संधी मिळालीय. पण मैदानावर त्यालाच खेळायचे आहे. इथे कोहली स्वतःच्या धावा राहुलला देणार नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यातील अपयशानंतरही राहुलने संघात स्थान कायम राखले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. पण एक प्रश्न राहुनराहून विचारासा वाटतो.
विराट कोहलीचा 'खास' भिडू कधी होणार पास?
रणजीचे स्टार आहेत कुठे?
लोकेश राहुलला आता संधी द्यावी की न द्यावी हा चर्चेचा मुद्दा आहे. त्याने कर्नाटकला अनेक स्थानिक सामन्यांत विजय मिळवून दिले आहेत, परंतु राष्ट्रीय संघासाठी त्याची कामगिरी फार बोलकी नाही. रणजी क्रिकेट स्पर्धेत खोऱ्याने धावा करणाऱ्या खेळाडूला राष्ट्रीय संघात स्थान मिळायला हवे. या निकषानुसार गेल्या पाच वर्षांत रणजी क्रिकेट स्पर्धेत धावांचा डोंगर उभारणाऱ्या खेळाडूंना संधी कधी मिळणार?
रणजी करंडक स्पर्धे मागील पाच मोसमात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
फैज फझल - 3761
हनुमा विहारी - 3706
प्रियांक पांचाळ - 3695
सुर्यकुमार यादव - 3395
श्रेयस अय्यर - 3176
2018-19च्या मोसमातील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
मिलंद कुमार ( सिक्कीम) 705
प्रियांक पांचाळ ( गुजरात) 540
रजत पाटीदार ( मध्य प्रदेश) 507
यशपाल सिंग ( मणिपूर) 506