ॲडिलेड : भारतीय कर्णधार विराट कोहली एक टोक सांभाळत असल्याचे दिसत असताना तो चुकीच्या वेळी धावबाद झाला आणि त्याचे परिणाम भारतीय संघाला भोगावे लागले. दिवस-रात्र कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने २३३ धावात ६ फलंदाजांना माघारी परतवले.
कोहलीने ७४ धावा केल्या होत्या आणि तो शतकाकडे आगेकूच करीत असल्याचे दिसत होते. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने त्याला चोरटी धावा घेण्यासाठी कॉल दिला, पण नंतर माघारी परतला. दुसरा नवा चेंडू घेण्याच्या काही वेळेपूर्वी कोहली धावबाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये कोहली दुसऱ्यांदा धावबाद झाला. यापूर्वी २०१२ मध्ये ॲडिलेडमध्येच तो धावबाद झाला होता.
एक वेळ भारताची ३ बाद १८८ अशी भक्कम स्थिती होती. कोहली बाद झाल्यानंतर भारताची ६ बाद २०६ अशी घसरगुंडी उडाली. फ्लडलाईटमध्ये गुलाबी चेंडूचा वेग व स्विंग तळाच्या मधल्या फळीतील फलंदाजांना हाताळण्यात अपयश आले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रविचंद्रन अश्विन (१५) व रिद्धिमान साहा (९) खेळपट्टीवर होते.
पहिल्या दिवशीची खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक होती. सुरुवातीला चेतेश्वर पुजारा व त्यानंतर कोहली यांनी संयमी फलंदाजी केली. कोहलीने आपल्या खेळीत १८० चेंडू खेळले, तर पुजाराने १६० चेंडूंना सामोरे जाताना ४३ धावा केल्या. रहाणेने ९१ चेडूंमध्ये ४२ धावांची खेळी केली.
कोहली व रहाणे यांनी तिसऱ्या सत्रात ८८ धावांची भागीदारी करीत भारताला दमदार धावसंख्या उभारून देण्याच्या दिशेने वाटचाल केली होती, पण कोहली बाद झाला. त्यानंतर रहाणेला स्टार्कने (२-४९) माघारी परतवले.
त्यापूर्वी दोन्ही सत्रात भारतीय फलंदाजांनी बचावात्मक पवित्रा स्वीकारला. पुजाराने एक चौकार लगावण्यासाठी १४८ चेंडूंची प्रतीक्षा केली. उपाहारानंतर फिरकीपटू नॅथन लियोनने त्याच्याविरुद्ध वर्चस्व गाजवले. त्याच्याविरुद्ध त्याने दोन चौकार लगावले. पण या ऑफ बॅक गोलंदाजाच्या चेंडूवर तो मार्नस लाबुशेनकडे सोपा झेल देत माघारी परतला.
त्याने तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार विराट कोहलीसोबत ६८ धावांची भागीदारी केली, पण त्याला दडपण झुगारता आले नाही. कोहली व पुजारा यांनी ५५ षटकात १.९४ च्या सरासरीने धावा केल्या. कोहलीने लियोनविरुद्ध फाॅरवर्ड डिफेन्सचा वापर केला.
त्याआधी सकाळच्या सत्रात पृथ्वी शॉचे कमकुवत तंत्र पुन्हा उघड झाले. भारताने सुरुवातीला ४१ धावात २ फलंदाज गमावले होते. शॉ खाते उघडण्यापूर्वीच सामन्याच्या दुसऱ्या चेंड़ूवर बोल्ड झाला. फॉर्मात असलेल्या गिलच्या तुलनेत शॉला संधी देण्याचा निर्णय चकित करणारा ठरला.
सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल (१७ धावा, ४० चेंडू) पॅट कमिन्सचा बळी ठरला.
ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज स्टार्कने १९ षटकात ४९ धावाच्या मोबदल्यात २ तर, कमिन्सने १९ षटकात ४२ धावाच्या मोबदल्यात १ बळी घेतला. जोश हेजलवूडने २० षटकात ४७ धावात एका फलंदाजाला माघारी परतवले. पुजाराने सकाळच्या सत्रात नव्या चेंडूला समर्थपणे तोंड दिले. २०१८-१९ च्या मालिकेत तो ऑस्ट्रेलियन आक्रमणापुढे भिंत म्हणून उभा होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी एवढे वर्चस्व गाजवले की पुजाराने एकदा सलग ३४ चेंडू डॉट खेळले.
शून्यावर बाद होताच पृथ्वी शॉ ट्रोल
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मयांक अग्रवाल सोबत सलामीला आलेला पृथ्वी शॉ याने आपल्या अपयशी खेळाची मालिका पुढे सुरू ठेवली. मिचेल स्टार्कच्या दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ शून्यावर माघारी परतला. पहिल्याच षटकात माघारी परतल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी पृथ्वीला ट्रोल केले. शॉ शून्यावर बाद होताच तब्बल १३ वर्षांनी भारतीय संघावर परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये नामुष्की ओढावली. याआधी २००७ साली चितगाव येथे बांगलादेशविरुद्ध कसोटीत भारताने पहिल्या डावात एकही धाव न करता एक गडी गमावला होता.
सामना सुरू होण्यापूर्वी समालोचन करताना रिकी पाँटिंगने पृथ्वी शॉ कसा बाद होऊ शकतो, याबाबत सांगितले होते. काही मिनिटांत पृथ्वी बाद झाला. पृथ्वीची दुखरी नस काय आहे याबाबत वक्तव्य केले. सुनील गावसकर यांच्यासोबत समालोचन करताना पाँटिंग म्हणाला होता, ‘शरीराजवळ न येणारा चेंडू पृथ्वी शॉची कमकुवत बाजू आहे. तो पॅड आणि बॅटमध्ये खूप अंतर राखतो. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतील.’
‘कोहलीला बाद करणे महत्त्वाचे होते. विराटला अशा प्रकारे बाद करणे ही आजच्या दिवसाच्या खेळातील ही महत्त्वाची घडामोड होती. तो चांगली फलंदाजी करीत होता. अशा प्रकारे त्याला माघारी परतवल्यामुळे आनंद झाला.’ - लियोन
धावफलक (भारत पहिला डाव)
पृथ्वी शॉ बोल्ड गो. स्टार्क ०, मयांक अग्रवाल बोल्ड गो. कमिन्स १७, चेतेश्वर पुजारा झे. लाबुशेन गो. लियोन ४३, विराट कोहली धावबाद ७४, अजिंक्य रहाणे पायचित गो. स्टार्क ४२, हनुमा विहारी पायिचित गो. हेजलवूड १६, रिद्धिमान साहा खेळत आहे ९, रविचंद्रन अश्विन खेळत आहे १५. अवांतर (१७). एकूण ८९ षटकांत ६ बाद २३३. बाद क्रम : १-०, २-३२, ३-१००, ४-१८८, ५-१९६, ६-२०६. गोलंदाजी : स्टार्क : १९-४-४९-२, हेजलवूड २०-६-४७-१, कमिन्स १९-७-४२-१, ग्रीन ९-२-१५-०, लियोन २१-२-६८-१, लाबुशेन १-०-३-०.