Join us  

India vs Australia, 1st Test : मयांक अग्रवालनं मोडला सुनील गावस्कर यांचा विक्रम, सलामीवीर म्हणून नोंदवला भारी पराक्रम 

India vs Australia, 1st Test, 3rd Day :भारतीय संघाने जबरदस्त गोलंदाजी करताना यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळत ५३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

By स्वदेश घाणेकर | Published: December 19, 2020 9:48 AM

Open in App

India vs Australia, 1st Test, 3rd Day : भारतीय संघाने जबरदस्त गोलंदाजी करताना यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळत ५३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मात्र, यावेळी भारताला खराब क्षेत्ररक्षणाचाही मोठा फटका बसला. क्षेत्ररक्षकांनी ऑस्ट्रेलियाच्या डावात काही सोपे झेल सोडले. जर का हे झेल घेण्यात भारताला यश आले असते, तर नक्कीच भारताला मजबूत आघाडी घेता आली असती. सध्या भारताकडे दुसऱ्या दिवसअखेर एकूण ६२ धावांची आघाडी होती. तिसऱ्या दिवशी मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) पहिल्या षटकातच महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला. 

शुक्रवारी ६ बाद २३३ धावांवरून सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाचा डाव कांगारूंनी २४४ धावांवर संपवला. यावेळी ऑसी खेळाडूंची देहबोली पाहता, ते सामन्यावर वर्चस्व गाजवणार असे दिसत होते. मात्र, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि उमेश यादव यांनी ऑसींना धक्के दिले. आर अश्विनला हलक्यात घेणं ऑस्ट्रेलियाला महागात पडले. अश्विननं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. यजमानांची अवस्था याहून अधिक बिकट झाली असती.

मात्र, युवा फलंदाज मार्नस लाबुशेन याला चक्क तीन जीवदान देण्याची मोठी चूक भारतीयांनी केली. या जीवदानाचा फायदा घेतलेल्या लाबुशेनने खेळपट्टीवर चांगलाच जम बसविला. ११९ चेंडूंत ७ चौकारांसह ४७ धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेतली.  कर्णधार टीम पेननं ( Tim Pain) एकाकी खिंड लढवताना अर्धशतकी खेळी केली. पेन ९९ चेंडूंत १० चौकारांसह ७३ धावांवर नाबाद राहिला.  उमेश यादवने तीन, तर जसप्रीत बुमराहनं दोन विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा करताना आघाडी ६२ धावांपर्यंत वाढवली. त्यात जसप्रीत बुमराहनं तिसऱ्या क्रमांकावर येताना भक्कम बचावात्मक खेळ केला. तिसऱ्या दिवशी बुमराह ( २) पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पण, मयांकनं कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. भारताकडून सर्वात जलद १००० धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. त्यानं १९ डावांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आणि गावस्कर यांचा २१ डावांचा विक्रम मोडला. विनोद कांबळी ( १४ डाव) आणि चेतेश्वर पुजारा ( १८ डाव) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर संजय मांजरेकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी प्रत्येकी २३ डावांत १००० धावा पूर्ण केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामयांक अग्रवालसुनील गावसकरविनोद कांबळीचेतेश्वर पुजारा