Join us  

India vs Australia 1st odi : धोनी-केदार ठरले विजयाचे शिल्पकार, भारताची ऑस्ट्रेलियावर मात

धोनीने केदार जाधवच्यासाथीने भारताला विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 9:02 PM

Open in App

हैदराबाद, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वात चांगला फिनीशर का आहे, याचे उत्तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिळाले. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन हे नावाजलेले फलंदाज शंभरी पार होण्यापूर्वीच बाद झाले होते. पण धोनीने केदार जाधवच्यासाथीने भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २३७ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान सहा विकेट्स राखून पूर्ण केले.

आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. शिखर धवनला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर रोहित आणि कोहली यांनी ७६ धावांची भागीदारी रचली. पण हे दोघे १५ धावांच्या फरकाने बाद झाले. त्यानंतर अंबाती रायुडूही झटपट बाद झाला आणि भारताची ४ बाद ९९ अशी अवस्था झाली. त्यानंतर धोनीने केदारला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला. केदारने या सामन्यात  ८७ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ८१ धावा केल्या. धोनीने ७२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५९ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय योग्य नसल्याचे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांनी पहिल्याच स्पेलमध्येच दाखवून दिले. शमीने पहिले षटक निर्धाव टाकले. त्यानंतरच्या दुसऱ्याच षटकात बुमराने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला शून्यावर बाद केले. त्यानंतर या दोघांच्या आठ षटकांच्या स्पेलमध्ये ऑस्ट्रेलियाला फक्त २३ धावाच करता आल्या होत्या. पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा धारण केला. पण रवींद्र जडेजा आणि केदार जाधव या दोघांनी अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला लगाम लावला.

केदारने पुन्हा एकदा भारताला मोठे यश मार्कस स्टॉइनिसच्या (३७) रुपात मिळवून दिले. कारण स्टॉइनिस आणि उस्मान ख्वाजा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली होती. स्टॉइनिस बाद झाल्यावर 10 धावांमध्ये अर्धशतकवीर ख्वाजाही बाद झाला. कुलदीपने उस्मान ख्वाजाच्या रुपात भारताला घवघवीत यश मिळवून दिले. ख्वाजाने ५० धावा पूर्ण केल्या खऱ्या, पण त्यानंतर लगेचच कुलदीपने विजय शंकरकरवी झेलबाद केला आणि तंबूचा रस्ता दाखवला. ख्वाजा बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाची धावगती रोढावली. पण ट्वेन्टी-२० मालिका गाजवणारा ग्लेन मॅक्सवेल पुन्हा आपले डोके वर काढू पाहत होता. पण शमीने मॅक्सवेलचा काटा काढत भारताला मोठे यश मिळवून दिले. शमीने टिच्चून मारा करत ४०व्या षटकातील पहिल्या चार चेंडूवर मॅक्सवेलला एकही धाव काढू दिली नाही. त्यानंतर पाचव्या चेंडूवर शमीने मॅक्सवेलला त्रिफळाचीत केले.

भारताकडून शमीने अचूक मारा केला, त्याला बुमरानेही चांगली साथ दिली. शमीने चांगला मार करत यावेळी १० षटकांत ४४ धावा देत २ बळी मिळवले. कुलदीपनेही चांगला फिरका मार करत दोन फलंदाजांना १० षटकांत ४६ धावा देत बाद केले. मधल्या षटकांमध्ये जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या धावांची गती कमी केली. या गोष्टीचे दडपण स्टॉइनिस आणि ख्वाजा यांच्यावर वाढत गेले. त्यामुळेच केदार स्टॉइनिसचा बळी मिळवण्यात यश मिळाले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामहेंद्रसिंह धोनीकेदार जाधव