गेल्या आठवड्यातील दक्षिण आफ्रिकेच्या आॅस्टेÑलियाविरुद्ध अनपेक्षित विजयाने स्पर्धेत केवळ खळबळच माजली नाही, तर यामुळे भारताचा अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश झाला. यामुळे भारतीय चाहत्यांना जल्लोष करण्याची मोठी संधी मिळाली. द. आफ्रिकेला नमवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याची संधी आॅस्टेÑलियाकडे होती. मात्र ऐनवेळी झालेल्या चुकांचा फटका बसल्याने आता कांगारुंना यजमान इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
श्रीलंकेविरुद्धचा अखेरचा सामना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारताला उपांत्य सामना खेळायचा असल्याने भारतीयांना विश्रांती घेण्यास वेळ मिळाला आहे. त्याचवेळी भारतीय चाहत्यांनाही या सामन्यानुसार आपले वेळापत्रक ठरविण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. अनेक भारतीय चाहते आपले काम आणि व्यवसाय सोडून येथे विश्वचषकाचा आनंद घेण्यास आले आहेत. शिवाय मंगळवारपर्यंत येथे आणखी भारतीय चाहत्यांची गर्दी वाढेल आणि त्यामुळे तिकिट विक्री आणखी जोरदार होईल हे नक्की.
विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्याविषयी सांगायचे झाल्यास भारतीय संघाचे पारडे निश्चित वरचढ दिसत आहे. त्याचबरोबर गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यासाठी भारताला नशिबाचीही साथ मिळाली. उपांत्य फेरीतील चारही संघांमध्ये न्यूझीलंड संघ काहीसा कमजोर भासत असला, तरी प्रत्यक्ष सामन्यात जो संघ सर्वोत्तम खेळ करेल, तोच संघ विजयी होईल. न्यूझीलंडची फलंदाजी खोलवर असून त्यांच्याकडे चांगल्या गोलंदाजांची फळीही आहे. त्यांचे आघाडीचे फलंदाज अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरले आणि त्यामुळेच त्यांचा संघ स्पर्धेबाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर आला होता.
त्याचवेळी, भारतीय संघाला गेल्यावेळी झालेल्या २०१५ सालच्या विश्वचषकातील कामगिरी लक्षात घेऊन खेळावे लागेल. कारण त्यावेळी भारताने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता आणि नंतर यजमान असलेल्या आॅस्टेÑलिया संघाविरुद्ध स्पर्धेतील एकमेव पराभव पत्करुन भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळेच मंगळवारी भारताला सावधपणे खेळावे लागेल.
- अयाझ मेमन कन्सल्टिंग एडिटर लोकमत