Join us  

एकतर्फी लढतीत न्यूझीलंडकडून भारत पराभूत

महिला वन डे विश्वचषक : हरमनप्रीतची झुंजार खेळी व्यर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 5:38 AM

Open in App

हॅमिल्टन : खराब फलंदाजीचा फटका बसलेल्या भारतीय संघाला आयसीसी महिला वन डे विश्वचषकात गुरुवारी यजमान न्यूझीलंडकडून ६२ धावांनी सहज पराभव पत्करावा लागला.  विश्वचषकाआधी द्विपक्षीय मालिकेत भारताला पराभूत करणाऱ्या न्यूझीलंडने  ९ बाद २६० धावा उभारल्या. भारताला त्यांनी ४६.४ षटकात १९८ धावात बाद केले.

या पराभवानंतर आठ संघांचा सहभाग असलेल्या विश्वचषकात भारत पाचव्या स्थानावर घसरला. ऑस्ट्रेलिया अव्वल तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. भारताकडून पूजा वस्त्रकारने दहा षटकात ३४ धावा देत चार गडी बाद केले.  हरमनप्रीत कौरने ६२ चेंडूंत ७१ धावा ठोकल्या, मात्र दुसऱ्या टोकाहून तिला साथ मिळू शकली नाही. न्यूझीलंडकडून एमेलिया केरने अष्टपैलू कामगिरी करीत  आधी अर्धशतकी खेळी केली व त्यानंतर नऊ षटकात ५६ धावा देत तीन गडी बाद केले.  भारताची कर्णधार मिताली राज हीदेखील केरची बळी ठरली. ऋचा घोष आणि हरमन यादेखील केरच्याच बळी  ठरल्या. मिताली अखेरच्या विश्वचषकात अविस्मरणीय खेळीपासून दूर आहे.  याशिवाय सामन्यात तीन डावखुऱ्या फलंदाजांना खेळविण्याची कोच रमेश पोवार यांची रणनीती फसली. खराब फॉर्ममध्ये असलेली शेफाली वर्मा हिला बाहेर बसविण्यात आले होते. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये सहापैकी पाच सामने हरला आहे.

झुलनचा सर्वाधिक बळींचा संयुक्त विक्रमभारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी महिला विश्वचषकात सर्वाधिक ३९ गडी बाद करणारी गोलंदाज बनली. झुलनने ऑस्ट्रेलियाची फिरकी गोलंदाज लिन फुलस्टोन हिच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. कारकिर्दीत पाचवा विश्वचषक खेळत असलेल्या झुलनने न्यूझीलंडची यष्टिरक्षक केटी मार्टिन हिला बाद करीत हा विक्रम नोंदविला. ऑस्ट्रेलियाकडून १९८२ ते १९८८ या कालावधीत फुलस्टोनने २० सामन्यात ३९ गडी बाद केले होते. झुलनने ३० सामन्यात अशी कामगिरी केली. इंग्लंडची माजी ऑफस्पिनर कॅरोन होजेस हिचे २४ सामन्यात ३७ बळी आहेत.

खेळपट्टी खराब नव्हती, फलंदाजी ढेपाळली : मितालीआयसीसी महिला वन डे विश्वचषकाच्या साखळी सामन्यातील पराभवास भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिने फलंदाजांना दोषी मानले आहे.  आघाडीच्या फलंदाजांची कामगिरी ख्यातीनुरूप होऊ न शकल्याने सामन्यात संघर्ष करण्यासाठी फलंदाजच उरले नव्हते, असे मिताली म्हणाली.‘आघाडीच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांकडून अपेक्षेनुसार कामगिरी होताना दिसत नाही. अन्य संघ मात्र २५०-२६० धावा सहजपणे काढत आहेत.  आघाडीच्या फलंदाजांनी जबाबदारीने धावा काढल्या असत्या, तर हे लक्ष्य गाठणे कठीण नव्हते. सतत फलंदाज बाद होत गेल्यामुळे दडपण वाढत गेले. आमच्याकडे फलंदाज शिल्लक नव्हते. खेळपट्टीवर उसळी होती; मात्र फलंदाजांसाठी ही खेळपट्टी वाईट नव्हती,’ असे मितालीने यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

संक्षिप्त धावफलकन्यूझीलंड : ५० षटकात ९ बाद २६०(सोफी डिव्हाईन ३५, एमेलिया केर ५०, एमी सेटर्थवेट ७५, मॅडी ग्रीन २७, कॅटी मार्टिन ४१, फ्रान्सिस मॅके नाबाद १३) गोलंदाजी :  झुलन गोस्वामी ४१-१, राजेश्वरी गायकवाड ४६-२, पूजा वस्त्रकार ३४-४, दीप्ती शर्मा ५२-१,भारत : ४६.४ षटकात सर्वबाद १९८(यास्तिका भाटिया २८, मिताली राज ३१, हरमनप्रीत कौर ७१, स्नेह राणा १८, झुलन गोस्वामी १५, मेघना सिंग नाबाद १२) गोलंदाजी : केर ४०-१, रोव २८-१, ताहुहू १७-३, जेन्सन ३०-२, एमिली केर ५६-३.  

Open in App