Join us  

भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत, इंग्लंडच्या आशेवर ‘पाणी’

इंग्लंडला साखळी फेरीत एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण इतर सामन्यांत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 3:39 AM

Open in App

सिडनी : मुसळधार पावसामुळे एकही चेंडू न टाकता भारत विरुद्ध इंग्लंड सामना रद्द झाला. यानंतर स्पर्धेत अपराजित राहिल्याचा फायदा घेत भारतीय संघाने महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच प्रवेश केला. पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. त्यामुळे गुणांच्या जोरावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले.साखळी फेरीत भारताने ४ सामने जिंकून ८ गुण मिळवले होते, तर इंग्लंडचे ३ सामन्यातून ६ गुण होते. स्पर्धेच्या नियमांच्या आधारे भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. इंग्लंडला साखळी फेरीत एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण इतर सामन्यांत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ अपराजित आहे. मात्र इंग्लंडने २००९, २०१२, २०१४ आणि २०१६ तसेच २०१८च्या विश्वचषकात भारताला हरवले होते. त्यामुळे गुरुवारच्या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर पावसामुळे सामना होऊ शकला नाही आणि इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंड संघ मागच्या विश्वचषकात उपविजेता होता. याआधी सातवेळा भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते. यंदा मात्र दमदार कामगिरीच्या बळावर जेतेपदाचा संभाव्य दावेदार म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. >आम्हाला तुमचा अभिमान - कोहलीभारतीय महिला क्रिकेट संघाचे पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहली याने अभिनंदन केले आहे. तुमच्या कामगिरीवर आम्हाला अभिमान वाटतो, या शब्दात कोहलीने महिला खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. कोहलीने टिष्ट्वट केले, ‘भारतीय महिला संघाचे टी२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठल्याबद्दल अभिनंदन. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे. अंतिम सामन्यासाठी सर्वांना शुभेच्छा.’ माजी कर्णधार वीरेंद्र सेहवाग यानेही भारतीय संघाचे अभिनंदन केले. तो म्हणाला, ‘गटातील सर्व सामने जिंकण्याचे बक्षीस मिळाले.’ माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने भारताच्या अपराजित कामगिरीची प्रशंसा करताना सांगितले, ‘सामना झाला असता तर बरे वाटले असते. भारतीय मुलींना महिला दिनी होणाºया अंतिम सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा.’>‘सामना न खेळवताच स्पर्धेबाहेर का काढता?’पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर इंग्लंड संघाची कर्णधार हीथर नाईट हिने आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ‘अशा पद्धतीने स्पर्धेबाहेर होणे खूपच त्रासदायक असून अशाप्रकारे आव्हान संपुष्टात येणे अपेक्षित नव्हते. उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस नाही. खेळण्याची संधीही मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवाचा फटका आम्हाला बसला. साखळीत पहिल्या पराभवानंतर कसेही करून उपांत्य फेरी गाठायची होती. आम्ही ते करून दाखवले, मात्र हवामानाचे कारणाने स्पर्धेबाहेर काढणे त्रासदायक आहे,’ अशा शब्दांत नाईटने संताप व्यक्त केला. राखीव दिवस नसल्याबद्दल नाईट म्हणाली, ‘नियमांवर सर्वांनी स्वाक्षरी केली आहे. यापुढे मात्र नियमात बदल होईल, अशी अपेक्षा आहे. मेहनतीने आम्ही उपांत्य फेरी गाठली. केवळ पावसामुळे स्पर्धेबाहेर काढणे हे पटणारे नसले तरी नियम सर्वांना सारखे आहेत. ही निराशा पचविणे कठीण होत आहे.’>ंअंतिम लढतीला आईवडिलांचीहजेरी - हरमनप्रीत‘भारतीय संघ टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रथमच दाखल झाला, हा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे, तसेच, प्रथमच आईवडील अंतिम सामन्याला हजेरी लावणार असल्याने या आनंदात मोठी भर पडली,’ अशी प्रतिक्रिया भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने दिली.हरमनप्रीत म्हणाली, ‘शाळेत वडील खेळ पाहायला यायचे. आईने कधीही माझा सामना पाहिलेला नाही. आज माझा खेळ पाहण्याची इच्छा होती, मात्र दुर्दैवाने खेळ झाला नाही. रविवारी माझा ३१ वा वाढदिवस असून आईवडील एमसीजीवर अंतिम सामना पाहतील. दोघांच्याही आशीर्वादाने विश्वचषक जिंकण्याचा आमचा प्रयत्न राहील.’विश्वचषकाच्या वेळापत्रकात राखीव दिवस असायला हवा होता, असे सांगताना हरमनप्रीत म्हणाली, ‘दुर्दैवाने सामना झाला नाही. मात्र नियमांच्या चौकटीत राहावेच लागेल. भविष्यात मात्र राखीव दिवस ठेवणे योग्य ठरेल.’ साखळी फेरीबाबत ती म्हणाली, ‘उपांत्य फेरीसाठी सर्वच सामने जिंकावे लागतील, याची पहिल्या दिवसापासून जाणीव होती. काही कारणांस्तव उपांत्य सामना न झाल्यास अडचण येऊ शकते, याचा वेध घेत सांघिक खेळाच्या जोरावर आम्ही अपराजित प्रवास केला.’