Join us  

भारत अंतिम फेरीत, बांगलादेशचा १७ धावांनी पराभव

कर्णधार रोहित शर्माचे (८९) आक्रमक अर्धशतक आणि त्यानंतर युवा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर (३/२२) याने घेतलेली फिरकी याजोरावर भारताने टी२० तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारताना बांगलादेशचा १७ धावांनी पराभव केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 4:18 AM

Open in App

कोलंबो : कर्णधार रोहित शर्माचे (८९) आक्रमक अर्धशतक आणि त्यानंतर युवा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर (३/२२) याने घेतलेली फिरकी याजोरावर भारताने टी२० तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारताना बांगलादेशचा १७ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या. मुशफिकुर रहिमने (७२*) पुन्हा एकदा शानदार अर्धशतक झळकावले, परंतु संघाला विजयी करण्यात तो अपयशी ठरला. रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.आर. प्रेमदासा स्टेडियमवर खराब फॉर्मच्या गर्तेत सापडलेल्या रोहित शर्माने आपल्या लौकिकानुसार ६१ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांसह ८९ धावांचा तडाखा देत भारताच्या धावसंख्येला बळकटी दिली. अनुभवी सुरेश रैनानेही ३० चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांचा चोप दिला. या दोघांनी दुसऱ्या बळीसाठी १०२ धावांची भागीदारी केली. याजोरावर भारताने २० षटकात ३ बाद १७६ धावांची मजल मारली.धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची अडखळती सुरुवात झाली. वॉशिंग्टन सुंदरने तमिम इक्बाल (२७), लिटॉन दास (७) आणि सौम्य सरकार (१) या प्रमुख फलंदाजांना बाद करुन बांगलादेशची सहाव्या षटकात ३ बाद ४० अशी अवस्था केली. यानंतर लगेच युझवेंद्र चहलने कर्णधार महमुद्दुल्लाहचा (११) महत्त्वपूर्ण बळी मिळवत बांगलादेशची कोंडी केली. परंतु, एका बाजूने टिकलेल्या रहिमने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करत बांगलादेशच्या आशा कायम राखल्या. त्याने शब्बीर रहमानसह (२७) पाचव्या बळीसाठी ६५ धावांची भागीदारी करतसंघाला काहीवेळ विजयी मार्गावर ठेवले.शार्दुल ठाकूरने १७व्या षटकात रहमानला बाद करुन ही जोडी फोडली त्यानंतर भारतीयांनी टिच्चून मारा करत सामना बांगलादेशच्या आवाक्याबाहेर नेला.तत्पूर्वी, सातत्याने अपयशी ठरत असल्याने टीकेचे लक्ष्य ठरत असलेल्या रोहितने धमाकेदार अर्धशतकासह आपला फॉर्म मिळवला. शिखर धवननेही दांडपट्टा चालू केल्याने बांगलादेश दडपणाखाली आले. मात्र, तरीही पहिल्या १० षटकांमध्ये भारताची ७ धावांच्या सरासरीने वाटचाल सुरु होती. दोघांनी भारताला ७० धावांची सलामी दिली. रुबेल हुस्सैन याने धवनला त्रिफळाचीत करुन ही जोडी फोडली. धवनने २७ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ३५ धावा केल्या. यानंतर आलेल्या सुरेश रैनाने रोहितला चांगली साथ देताना भारताच्या धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न केला. (वृत्तसंस्था)या सामन्यात सर्वांच्या नजरा ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या खेळीवर लागल्या होत्या. रोहितने आपल्या लौकिकानुसार आक्रमक फटके खेळत आपण फॉर्म पुन्हा मिळवल्याचा विश्वास संघाला दिला.रोहितचे फॉर्ममध्ये येणे भारतासाठी महत्त्वपूर्ण असून रविवारी होणाºया अंतिम सामन्यातहंी रोहितने सातत्य राखले, तर भारताला या मालिकेचे विजेतेपद पटकावण्यापासून रोखणे कठीण बनेल.>श्रीलंका - बांगलादेश लढत निर्णायकभारताला अखेरच्या षटकांमध्ये आक्रमकतेपासून रोखल्यानंतर बांगलादेशसाठी एकवेळ विजय अवाक्यात होता. यावेळी त्यांची सर्व मदार मुशफिकुर रहिम याच्यावर होत्या. याआधी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेने दिलेल्या २१५ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यावेळीही रहिमने नाबाद ७२ धावांचा तडाखा देत बांगलादेशला विक्रमी विजय मिळवून दिला होता. मात्र, भारताविरुद्ध त्याला यश आले नाही. मोक्याच्यावेळी सहकारी फलंदाज बाद झाल्याने बांगलादेश पराभूत झाला. भारताने बांगलादेशचा १७ धावांनी पराभव करुन गुणतालिकेत सर्वाधिक ६ गुणांची कमाई करत अव्वल स्थानी झेप घेतली. यासह भारताने दिमाखात अंतिम फेरीतही प्रवेश केला. त्याचवेळी श्रीलंका आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी एक विजय मिळवला असल्याने दोघांच्याही खात्यावर २ गुणांची नोंद आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारा सामना दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीसारखा असेल. शुक्रवारी होणाºया निर्णायक सामन्यात जो संघ विजेता होईल, तो संघ रविवारी विजेतेपदासाठी भारताविरुद्ध भिडेल. दरम्यान, स्पर्धेतील एकूण कामगिरी पाहता भारतीयांना संभाव्य विजेते मानले जात आहे.>धावफलक :भारत : रोहित शर्मा धावबाद (रुबेल) ८९, शिखर धवन त्रि. गो. रुबेल ३५, सुरेश रैना झे. सरकार गो. रुबेल ४७, दिनेश कार्तिक नाबाद २; अवांतर - ३. एकूण : २० षटकात ३ बाद १७६ धावा.गोलंदाजी : अबु हिदर ४-०-४३-०; नझमूल इस्लाम ४-०-२७-०; रुबेल हुसैन ४-०-२७-२; मुस्तफिझूर रहमान ४-०-३८-०; मेहदी हसन मिराझ ३-०-३१-०; महमुद्दुलाह १-०-९-०.बांगलादेश : तमिम इक्बाला त्रि. गो. सुंदर २७, लिटॉन दास यष्टीचीत कार्तिक गो. सुंदर ७, सौम्य सरकार त्रि. गो. सुंदर १, मुशफिकुर रहिम नाबाद ७२, महमुद्दुल्लाह झे. राहुल गो. चहल ११, शब्बीर रहमान त्रि. गो. शार्दुल २७, मेहेदी हसन झे. रैना गो. सिराज ७, अबु हिदर नाबाद ०. अवांतर - ७. एकूण : २० षटकात ६ बाद १५९ धावा.गोलंदाजी : मोहम्मद सिराज ४-०-५०-१; वॉशिंग्टन सुंदर ४-०-२२-३; शार्दुल ठाकूर ४-०-३७-१; युझवेंद्र चहल ४-०-२१-१; विजय शंकर ४-०-२८-०.

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ