Join us  

भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला, पण कोहलीच्या कॅप्टन्सीचे काय...

सध्याच्या टीम इंडियामध्ये.स्वतः कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्री या दोघांचा अपवाद वगळता कुणाचेच स्थान निश्चित नाही.

By बाळकृष्ण परब | Published: January 19, 2019 1:14 PM

Open in App
ठळक मुद्देसध्याच्या भारतीय संघातील अनिश्चितता ही कर्नाटकमधील राजकारणात सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या तोडीची आहे.विराटच्या नेतृत्वातील आक्रमकतेचा अतिरेक झाला की आक्रस्थाळी वाटू लागते.परिस्थिती थोडी बिघडली की विराटची अवस्था कुरुक्षेत्रात ऐनवेळी विद्या विसरलेल्या कर्णाप्रमाणे होते.

मुंबई : अखेर कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयापाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही विराटसेनेने विजय मिळवला. या विजयाने भारतीय क्रिकेट संघाचा यावेळचा ऑस्ट्रेलिया दौरा खऱ्या अर्थाने सुफळ संपूर्ण झाला. ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला. खरंतर एक ट्वेंटी-20 सामना पावसाने वाहून गेला नसता तर ट्वेंटी-20 मालिकाही आपल्या खिशात असती. असो, गेले ते गेले पण जे मिळाले ते काही थोडके नाही. त्यासाठी भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीचे अभिनंदन करायलाच हवे. 

आता सध्याचा ऑस्ट्रेलियन संघ दुबळा आहे. त्यांच्याकडे पूर्वीसारखे खेळाडू नव्हते, वगैरे खुसपटे काढून काही मंडळी या विजयाच्या आनंदात मिठाचा खडा टाकताहेत. पण त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघात मँथ्यू हेडन, जस्टिन लँगर, रिकी पाँटिग, मायकेल क्लार्क यांसारखे फलंदाज आणि ग्लेन मँकग्रा, ब्रेट ली, मिचेल जॉन्सन, शेन वॉर्नसाखे अव्वल गोलंदाज नव्हते हे मान्य; पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात तरी सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, कुंबळे, सेहवाग कुठे होते. त्यातही ते घरच्या मैदानात खेळत होते आणि परिस्थिती आपल्यासाठी प्रतिकूल होती. अशा परिस्थितीत लढून, झुंजून भारतीय संघाने यश मिळवले. ट्वेंटी-20 आणि एकदिवसीय मालिकेत तर पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने मालिकेत कमबॅक केले. त्यासाठी संघाच्या आणि कुशल  नेतृत्व करणाऱ्या कर्णधाराच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलीच पाहिजे. पण पाठीवर कौतुकाची थाप देताना भारतीय संघातील वास्तवाची जाणही ठेवली पाहिजे.

या संपूर्ण दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली असली तरी कर्णधार विराट कोहलीला फलंदाजी आणि कप्तानीमध्येही फार काही चमक दाखवता आली नाही. खरंतर भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतरही असं म्हणणं अनेकांना खटकणारं आहे. पण विराट कोहली प्रत्येक दौऱ्यात यशाचा एकएक टप्पा पार करत असला तरी त्याच्या नेतृत्वात सुधारणेसाठी बराच वाव असल्याचे राहून राहून वाटते. त्याला कारणंही तशीच आहेत. आता संघनिवडीचंच घ्या. सध्याच्या टीम इंडियामध्ये.स्वतः कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्री या दोघांचा अपवाद वगळता कुणाचेच स्थान निश्चित नाही. विश्वचषकासाठी चांगली संघबांधणी करण्यासाठी म्हणून सुरू असलेले प्रयोग अव्याहतपणे चालू आहेत. तसे ते यापूर्वीही सुरू होतेच म्हणा, पण सध्याच्या भारतीय संघातील अनिश्चितता ही कर्नाटकमधील राजकारणात सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या तोडीची आहे.

त्यात विराटच्या नेतृत्वातील आक्रमकतेचा अतिरेक झाला की आक्रस्थाळी वाटू लागते. आकडेवारीनुसार भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होण्याच्या दिशेने विराट कोहलीचा प्रवास सुरू आहे. पण आता आपल्याला चांगला कर्णधारही म्हटले जाईल यासाठी मेहनत घेण्याचे आव्हान विराटसमोर असेल. त्याचं कारण म्हणजे संघाची कामगिरी चांगली होत असताना विराट हा एखाद्या विराट योध्याप्रमाणे भासतो, पण परिस्थिती थोडी बिघडली की त्याची अवस्था कुरुक्षेत्रात ऐनवेळी विद्या विसरलेल्या कर्णाप्रमाणे होते. ही बाब काही चांगली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही ही बाब प्रकर्षाने जाणवली.

गोलंदाजांचा प्राधान्यक्रम काय असावा, एखादी जोडी जमली तर ती फोडण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला आक्रमणावर आणायचे, डीआरएस कसा वापरायचा? याबाबत विराट अजूनही नवख्याप्रमाणे वागतो. पण कप्तानीमध्ये इतकी वैगुण्ये असूनही तो आपल्या मर्यादा समजून संघाला विजय मिळवून देतोय ही समाधानाची बाब म्हटली पाहिजे. पण प्रत्येकवेळी अशा बाबी झाकोळल्या जातील असे नाही. विश्वचषक स्पर्धा तोंडावर आहे. अशावेळी विराटला आपल्या नेतृत्वातील दोष प्रयत्नपूर्वक दूर करावे लागतील. नाहीतर ते त्याच्यासाठी आणि भारतीय संघासाठीही अडचणीचे ठरतील.

टॅग्स :विराट कोहलीआॅस्ट्रेलियारवी शास्त्री