नवी दिल्ली : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा ७ गड्यांनी पराभव करीत मंगळवारी मालिका २-० ने खिशात घातली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या वाढदिवशी टीम इंडियाने मालिका विजयाची खास भेट दिली. भारताने १२१ धावांचे लक्ष्य सहज पार केले. कर्णधार या नात्याने गिलचा हा पहिला कसोटी मालिका विजय ठरला.
पहिल्या कसोटीत डावाने पराभूत होणाऱ्या वेस्ट इंडिजने दिल्लीत टीम इंडियाला कडवी टक्कर दिली. फॉलोऑन स्वीकारावा लागल्यानंतरही त्यांनी भारतासमोर आव्हान उभे केले आणि सामना पाचव्या दिवसापर्यंत लांबविला. भारताने पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला.
यशस्वी जैस्वाल (१७५) व शुभमन गिल (नाबाद १२९) यांची शतके वैशिष्ट्यपूर्ण ठरली. त्यानंतर कुलदीप यादव (५) व रवींद्र जडेजा (३) यांच्या फिरकीने विंडीजचा पहिला डाव २४८ धावांवर गुंडाळून पहिल्या डावात २७० धावांची आघाडी घेतली.
त्यानंतर विंडीजकडून जॉन कॅम्पबेल (११५) व शाय होप (१०३) यांनी शतक झळकावून तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी १७७ धावा ठोकल्या. दोघांच्या योगदानानंतरही विंडीजचा डाव अडखळत होता. जेडन सील्स व जस्टिन ग्रिव्ह्ज यांनी अखेरच्या गड्यासाठी ७९ धावांची भागीदारी करून भारतापुढे १२१ धावांचे लक्ष्य ठेवले.
चौथ्या दिवशी यशस्वी (८) लवकर बाद झाल्यानंतर लोकेश राहुल व साई सुदर्शन ही जोडी मैदानात होती. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १६२ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. साई ३९ धावांवर झेलबाद झाला. रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर शाय होपने स्लीपमध्ये अफलातून झेल घेतला. कर्णधार शुभमन गिलने (१३) आक्रमक फटकेबाजी केली तर लोकेश राहुल ५८ धावांवर नाबाद राहिला. राहुलने ६ चौकार आणि २ षट्कार ठोकले. ध्रुव जुरेल ६ धावांवर नाबाद राहिला. कुलदीप यादव सामनावीर, तर रवींद्र जडेजा मालिकावीर ठरला. विंडीजविरुद्ध विजयासह भारताने डब्ल्यूटीसी गुणतालिकेत स्थान बळकट केले आहे. भारताला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळायची आहे.
धावफलक
भारत पहिला डाव : ५ बाद ५१८ वर घोषित.
वेस्ट इंडिज पहिला डाव : २४८ आणि दुसरा डाव : ३९० धावा.
भारत दुसरा डाव : यशस्वी जैस्वाल झे. फिलिप गो. वॉरिकन ८, लोकेश राहुल नाबाद ५८, साई सुदर्शन झे. होप मो. चेस ३९, शुभमन गिल झे. ग्रिव्हृज गो. चेस १३, ध्रुव जुरेल नाबाद ६, अवांतर : ००, एकूण : ३५.२ षटकांत ३ बाद १२४.
बाद क्रम : १/९, २/८८, ३/१०८.
गोलंदाजी : जेडन सील्स ३-०-१४-०, जोमेल वॉरिकन १५.२-४-३९-१, खारी पियरे ८-०-३५-०, रोस्टन चेस ९-२-३६-२.
जडेजाला पैकीच्या पैकी
मायदेशात प्रथमच नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या गिलने दुबळ्या वेस्ट इंडिजचा २-० ने धुव्वा उडवत यशस्वी शुभारंभ केला. यंग टीम इंडियाने या मालिकेत दमदार कामगिरी केली. विशेषत: रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल आणि कुलदीप यादव यांचा खेळ इतरांपेक्षा काकणभर सरस ठरला. यानिमित्ताने स्पोर्ट्स क्रीडा या संकेतस्थळाने प्रत्येक खेळाडूला त्याच्या कामगिरीनुसार गुण दिले आहेत.
नेतृत्व करण्याची सवय जडली...
भारताचे नेतृत्व करणे हा मोठा सन्मान आहे. सर्व खेळाडूंना सांभाळणे, या संघाचे नेतृत्व करणे याची आता सवय झाली आहे. मी शक्य तितका परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो आणि कधीकधी तुम्हाला धाडसी निर्णय घ्यावा लागतो. जो खेळाडू तुम्हाला निश्चित धावा काढून देऊ शकतो किंवा बळी घेऊ शकतो यावर हा धाडसी निर्णय अवलंबून असतो. शुभमन गिल
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी या सामन्यात संघर्ष केला, तरी रोस्टन चेस हा क्रेग ब्रेथवेटनंतर कर्णधार म्हणून पहिले पाच कसोटी सामने गमविणारा दुसरा कर्णधार बनला.
२००२ नंतर भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धचा हा सलग १०वा कसोटी मालिका विजय ठरला. ही एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्धची दुसरी सर्वोत्तम संख्या आहे. दक्षिण आफ्रिकेने १९९८ ते २०२४ या कालावधीत वेस्ट इंडिजविरुद्ध सलग १० मालिका जिंकल्या होत्या.
भारतात भारताविरुद्ध वेस्ट इंडिजचा हा सलग सहावा पराभव ठरला. त्यांनी न्यूझीलंड (२०१०-१६) व श्रीलंका (१९८६ ते ९४) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने २००८ ते १३ या कालावधीत सलग सात सामने गमावले होते.
भारताचा २०२५ मध्ये सर्व प्रकारांत हा २३ वा विजय ठरला. यासोबतच वर्षभरात २२ विजयाची नोंद करणाऱ्या न्यूझीलंडला भारताने मागे टाकले. भारतीय संघाने यंदा कसोटीत ४, वनडे ८ आणि टी-२०त ११ विजय नोंदविले.
भारताचा मायदेशातील हा १२२ वा कसोटी विजय होता. भारताने २९६ कसोटी सामने भारतात खेळताना १२२ विजय मिळविले. मायदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या संघांमध्ये भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आला.