भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने २-० अशा फरकाने जिंकली आहे. या विजयात भारताचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने या मालिकेत चमकदार कामगिरी केली. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले, तर दुसऱ्या कसोटीत गोलंदाजीने महत्त्वाचे योगदान दिले. त्याच्या या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. या कामगिरीसह त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या कामगिरीची बरोबरी केली.
मायदेशात रवींद्र जडेजाने कसोटीमध्ये तिसऱ्यांदा मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. या विक्रमासह त्याने भारताचे माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या विक्रमाची बरोबरी साधली. या तिन्ही खेळाडूंनी भारतात प्रत्येकी तीन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. भारतीय भूमीवर कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा 'मालिकावीराचा' पुरस्कार जिंकण्याचा विक्रम फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनच्यानावावर आहे, त्याने नऊ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
मालिकावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर रवींद्र जडेजाने आपल्या यशाचे श्रेय फलंदाजीतील बदललेल्या भूमिकेला दिले. तो म्हणाला की, "मुख्य प्रशिक्षकांनी सांगितले की मी आता सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. त्यामुळे मी एका योग्य फलंदाजासारखा विचार करत आहे आणि ती माझ्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे." गेल्या अनेक वर्षांपासून आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर फलंदाजी केल्यामुळे त्याची मानसिकता वेगळी होती, मात्र आता वरच्या क्रमांकावर खेळण्याने जबाबदार फलंदाजासारखा विचार करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्याच्या खेळात सुधारणा झाली आहे, असे त्याने स्पष्ट केले.
दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने यशस्वी जयस्वालचे (१७५) आणि कर्णधार शुभमन गिलचे (नाबाद १२९) शतक यांच्या जोरावर ५१८ धावांवर डाव घोषित केला. वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर आटोपल्यानंतर भारताने त्यांना फॉलोऑन दिला. मात्र, दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी कडवी झुंज देत ३९० धावा केल्या, आणि भारतासमोर विजयासाठी १२१ धावांचे माफक आव्हान ठेवले. केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने हे लक्ष्य केवळ तीन विकेट्स गमावून सहज गाठले आणि मालिका २-० ने जिंकून वेस्ट इंडिजविरुद्ध क्लीन स्वीप केला.