Join us

भारत ‘अ’ संघाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघावर डावाने मात

डी सेकेंड व शॉन वॉन बर्गच्या संघर्षपूर्ण खेळीनंतरही भारत ‘अ’ संघाने मंगळवारी पहिल्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात द. आफ्रिका ‘अ’ ला एक डाव व ३० धावांनी नमवून दोन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 04:14 IST

Open in App

बेंगळुरू : डी सेकेंड व शॉन वॉन बर्गच्या संघर्षपूर्ण खेळीनंतरही भारत ‘अ’ संघाने मंगळवारी पहिल्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात द. आफ्रिका ‘अ’ ला एक डाव व ३० धावांनी नमवून दोन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली.पहिल्या डावात ३३८ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर मोहम्मद सिराजच्या (५-७३) भेदक माऱ्यापुढे द. आफ्रिका संघाची आघाडी फळी अपयशी ठरली. त्यावेळीच त्यांच्यावर मोठ्या फरकाने पराभवाचे संकट निर्माण झाले होत. त्यांचा दुसरा डाव ३०८ धावांत संपुष्टात आला.द. आफ्रिका ‘अ’ने मंगळवारी सकाळी ४ बाद ९९ धावसंख्येवरून सुरुवात केली. जुबैर हमजा (६३), सेकेंड (९४) व वॉन बर्ग (५०) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावली. हमजा दिवसाच्या नवव्या षटकात बाद झाला. त्यानंतर सेकेंड व वॉन बर्ग यांनी पुढील ५० षटके भारताला यश मिळू दिले नाही. त्यावेळी सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता निर्माण झाली. रजनीश गुरबाणीने (२-४५) ९९ व्या षटकात वॉन बर्गला तंबूचा मार्ग दाखवित ११९ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. तळाच्या फळीतील डेन पीट (३७ चेंडूत ८) व मालुसी सिबोतो (५० चेंडूंत नाबाद ७) यांनी बराच वेळ घालविला. युझवेंद्र चहलने सेकेंडला पायचित करीत त्याला शतकापासून वंचित ठेवले. सेकेंडने २१४ चेंडूत १५ चौकार मारले.अक्षर पटेलने ब्युरॉन हेंड्रिक्सला (१०), तर सिराजने दिवसाच्या अखेरच्या क्षणी डुआने ओलिव्हरला बाद करीत डावातील वैयक्तिक पाचवा बळी घेत भारताला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलक :दक्षिण आफ्रिका ‘अ’ (पहिला डाव) : सर्वबाद २४६ धावा.भारत ‘अ’ (पहिला डाव) : १२९.४ षटकात ८ बाद ५४८ धावा.दक्षिण आफ्रिका ‘अ’ (दुसरा डाव) : १२८.५ षटकात सर्वबाद ३०८ धावा (डी. सेकेंड ९४, झुबेर हामझा ६३, शॉन वॉन बर्ग ५०; मोहम्मद सिराज ५/७३, रजनीश गुरबाणी २/४५.)