नवी दिल्ली : मयांक मार्कंडेय (४/४८) व शाहबाज नदीम (३/३२) यांच्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर भारत ‘ब’ संघाने येथे देवधर ट्रॉफी एकदिवसीय सामन्यात भारत ‘अ’ संघाला ४३ धावांनी नमविले.
भारत ‘ब’ संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ८ बाद २६१ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात भारत ‘अ’ संघाचा डाव ४६.४ षटकांत २१८ धावांत गुंडाळला. भारत ‘अ’ संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने ९९ धावांची खेळी केली. त्याला रविचंद्रन अश्विन (५४) याचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारत ‘अ’ संघाला भारत ‘ब’ संघाच्या नदीमने तिसºयाच षटकात सलग दोन धक्के दिले. भारत ‘अ’ संघाने ८७ धावांत ५ गडी गमावले होते.
त्यानंतर कार्तिक व अश्विन यांनी डाव सावरला. कार्तिकने ११४ चेंडूत ११ चौकार व १ षटकार मारला. मार्कंडेयने अश्विनला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर नदीमने स्वत:च्याच गोलंदाजीवर कार्तिकचा झेल टिपला. नदीम सामनावीरचा मानकरी ठरला.
त्याआधी, भारत ‘ब’ संघाने हनुमा विहारी (८७) आणि मनोज तिवारी (५२) यांच्या खेळीच्या जोरावर २६१ धावांची आव्हानात्मक मजल मराली. (वृत्तसंस्था)