ऑस्ट्रेलिया पुन्हा...! टीम इंडियाला हरवले अन् वर्ल्ड कप जिंकून १४० कोटी भारतीयांना रडवले

ICC Under-19 World Cup Final IND vs AUS : ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या जेतेपदाच्या मार्गात पुन्हा एकदा आडवा आला. ऑस्ट्रेलियाने १९८८, २००२, २०१० आणि २०२४ असा चौथ्यांदा वर्ल्ड कप जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 08:44 PM2024-02-11T20:44:51+5:302024-02-11T21:01:49+5:30

whatsapp join usJoin us
IND19 vs AUS 19 Final : Australia Under-19s team beat India Under-19s team in ICC Under-19 World Cup Final by 79 runs  | ऑस्ट्रेलिया पुन्हा...! टीम इंडियाला हरवले अन् वर्ल्ड कप जिंकून १४० कोटी भारतीयांना रडवले

ऑस्ट्रेलिया पुन्हा...! टीम इंडियाला हरवले अन् वर्ल्ड कप जिंकून १४० कोटी भारतीयांना रडवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Under-19 World Cup Final IND vs AUS : ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या जेतेपदाच्या मार्गात पुन्हा एकदा आडवा आला. सीनियर वन डे वर्ल्ड कप, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताला ऑसींकडून हार पत्करावी लागली होती आणि त्यांचे आयसीसी स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले. पण, याचा वचपा ज्युनियर संघ घेईल असे वाटले होते. मात्र, आयसीसी स्पर्धा जिंकण्याचे बाळकडू मिळालेल्या ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा १४० कोटी भारतीयांना रडवले. १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. भारताला जेतेपद कायम राखण्यात अपयश आले. 


राज लिम्बानीने तिसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कोन्स्टॅसचा भोपळ्यावर त्रिफळा उडवला. पण, हॅरी डिक्सन ( ४२) व कर्णधार ह्युज वैबगेन ( ४८) यांनी ऑसींचा डाव सावरताना भारतीय गोलंदाजांना चांगला चोप दिला. नमन तिवारीने पुनरागमनाचे षटक टाकताना या दोघांना माघारी पाठवले. पण, हरजस सिंग ( ५५) व रायन हिक्स ( २०) यांना सेट होण्याची संधी भारतीय गोलंदाजांनी दिली. ऑलिव्हर पिक पुन्हा एकदा खेळपट्टीवर उभा राहिला आणि नाबाद ४६ धावा करून संघाला ७ बाद २५३ धावांपर्यंत घेऊन गेला. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप फायनलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी १९९८च्या फायनलमध्ये इंग्लंडने २४३ ( वि. न्यूझीलंड) धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. 


भारतासमोर हे मोठे आव्हान होते. २०२० पासून भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहिला आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. कॅलम व्हिड्लरने तिसऱ्या षटकात भारताचा सलामीवीर अर्शीन कुलकर्णीला ( ३) माघारी पाठवले. अर्शद सिंग व मुशीर खान ( २२) यांनी डाव सावरला होता, परंतु माहली बीअर्डमनने भारताच्या डावाला नजर लावली. त्याने मुशीर व कर्णधार उदय सहरान ( ८) यांची विकेट घेऊन टीम इंडियाला बॅकफूटवर फेकले. सचिन धस ( ९) व प्रियांषू अवनिष ( ९) यांनी आपापल्या विकेट अनुक्रमे राफ मॅकमिलन व चार्ली अँडरसन यांच्यासमोर फेकल्या. अरावेल्ली अवनिष ( ०) यानेही मॅकमिलनला लॉलीपॉप झेल दिला. तो कॉट अँड बोल्ड होऊन माघारी परतला.


सलामीवीर आदर्श सिंग भारतासाठी खिंड लढवत होता. पण, बिअर्डमनला ऑस्ट्रेलियाने पुन्हा गोलंदाजीला बोलावले आणि त्याने आदर्शला चूक करण्यास भाग पाडले. ७७ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४७ धावा करून आदर्श झेलबाद झाला आणि भारताने सातवा फलंदाज गमावला. पुढच्याच षटकात मॅकमिलन याने टाकलेला यॉर्कर राज लिम्बानीचा (०) त्रिफळा उडवून गेला. मुरुगन अभिषेकवरच आता भारताची सर्व भीस्त होती आणि त्याने काही सुरेख फटकेही खेचले. नॉन स्ट्रायकर नमन तिवारी त्याला सांगत होता, मुरू हारें गे, लेकीन सिख के जाएंगे ( हरू पण, या सामन्यातून शिकू)... या दोघांनी सामन्यातील भारताकडून सर्वोत्तम भागीदारी ( ४५) नोंदवली.


६० चेंडूंत ८८ धावा असा सामना अजूनही जीवंत होता, परंतु भारताकडे फक्त दोन विकेट शिल्लक असल्याने ऑसींचे पारडे जड होते. पण, तिवारीचा सोपा झेल टाकला गेला. पण, पुढच्याच चेंडूवर विड्लरने मुरुगनला ( ४२) झेल देण्यास भाग पाडले आणि भारताचा पराभव पक्का झाला.  भारताचा संपूर्ण संघ १७४ धावांत तंबूत परतला आणि ऑस्ट्रेलियाने ७९ धावांनी सामना जिंकला. 

Web Title: IND19 vs AUS 19 Final : Australia Under-19s team beat India Under-19s team in ICC Under-19 World Cup Final by 79 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.