मुंबई : भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीचे महत्त्वाचे स्थान आहेच, परंतु रोहित शर्मा हा वन डे संघाचा मजबूत पाया आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या वन डेत 150 हून अधिक धावा करताना रोहितने जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. फलंदाजीतील शैली व्यतिरिक्त मुंबईत झालेल्या त्या सामन्यात रोहितची देशभक्ती पाहायला मिळाली.
ब्रेबॉर्न स्टेडियावर झालेल्या सामन्यात रोहित सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी रोहित...रोहित असा जयघोष केला. त्यानंतर 31 वर्षीय रोहितने जर्सीवर लिहिलेल्या इंडियाकडे इशारा करत प्रेक्षकांना 'India India'चा केला जयघोष करण्यास सांगितले.
रोहितने चौथ्या सामन्यात 162 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने 377 धावांचा डोंगर उभा केला. त्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 153 धावांत तंबूत परतला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पाचवा व अखेरचा सामना केरळा येथे गुरुवारी होणार आहे.