Join us  

IND vs WIN 5th ODI : ऐतिहासिक विक्रमासाठी महेंद्रसिंग धोनीला हवीय एक धाव

IND vs WIN 5th ODI : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम नुकताच नावावर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 11:35 AM

Open in App

केरळ : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम नुकताच नावावर केला. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आणि दहा हजार धावा करणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला.  माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही दहा हजार धावांचा पल्ला खुणावत आहे. त्याला  भारतीय जर्सीत दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी केवळ एकच धाव हवी आहे. 

वन डे क्रिकेमध्ये त्याच्या नावावर 10173 धावा दिसत असल्या तरी भारतीय जर्सीत त्याने 9999 धावाच केल्या आहेत. त्याने 2007 मध्ये आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना आफ्रिका एकादश संघाविरुद्ध 174 धावा केल्या आहेत. धोनीने मुंबईत झालेल्या चौथ्या वन डे सामन्यातच हा पल्ला पार केला असता, परंतु केमार रोचने त्याला 23 धावांवर असताना बाद केले. धोनीची कामगिरी सध्या निराशाजनक होत आहे. त्याने मागील 12 डावांत केवळ 252 धावा केल्या आहेत. त्यामुळेच 2019च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत त्याला संधी द्यायची की नाही, यावर चर्चा सुरु झाली आहे. 

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात बीसीसीआयने धोनीला स्थान दिलेले नाही. या मालिकांसाठी संघात रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात आली आहे. 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज