मुंबई : कसोटी आणि वन डे मालिकेत पराभव पत्करावा लागला. पण, ट्वेंटी-20 मालिकेत त्यांचे पारडे यजमान भारतापेक्षा जड वाटत आहे, परंतु मालिका सुरु होण्यापूर्वी त्यांना धक्का बसला आहे. त्यांचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल रविवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्याला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुबईहून भारतात येणारी कनेंक्टींग फ्लाईट चुकल्यामुळे रसेल कोलकाता येथे दाखल होऊ शकलेला नाही.
वेस्ट इंडिज संघाच्या सराव सत्रात रसेलची अनुपस्थिती खटकत होती. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या या खेळाडूसाठी इडन गार्डन हे घरचे मैदान आहे. ''रसेलच्या मुद्यावर कोणतीही प्रतिक्रीया द्यायची नाही. अजूनही अधिकृत माहिती मिळायची आहे,''असे वेस्ट इंडिजच्या प्रसिद्धी प्रमुखाने सांगितले.
कर्णधार कार्लोस ब्रॅथवेट याच्यासह रसल 1 नोव्हेंबरला भारतात येणे अपेक्षित होते.''ब्रॅथवेटसह सात खेळाडू व्हाया लंडनहून 1 नोव्हेंबरला भारतात दाखल झाले आहेत. रसल दुबईहून येणार होता, परंतु त्याची कनेक्टेड फ्लाईट चुकल्याचे समजते,''असे स्थानिक व्यवस्थापक मोईन बीन मक्सूद याने सांगितले. 30 वर्षीय रसल अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमध्ये नांगरहार लेपर्ड्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता. मात्र, त्याला दुखापत झाली आणि त्याचा विंडीजच्या वन डे संघात समावेश करण्यात आला नाही.