कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना कोलकाता येथील इडन गार्डनवर खेळवण्यात येणार आहे. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्मा सांभाळणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने नुकताच आशिया चषक उंचावला. त्यामुळे ट्वेंटी-20 मालिकेतही त्याच्याकडून चषक पटकावण्याची अपेक्षा आहे. इडन गार्डन स्टेडियम आणि रोहित शर्मा यांच्यातील नातं तसं फार घट्ट आहे.
6 नोव्हेंबर 2013 मध्ये रोहितने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले, ते याच मैदानावरून. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या कसोटीत 177 धावांची तुफानी खेळी करताना भारताचा एक डाव व 51 धावांनी विजय निश्चित केला. त्यात वन डे तील 264 धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळीही याच मैदानावर केली आहे. त्याने 13 नोव्हेंबर 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वन डे सामन्यात 264 धावा चोपल्या होत्या.
इडन गार्डनवर रोहितची बॅटिंग सरासरी ही 76.06 इतकी आहे. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील 20 डावांमध्ये आठवेळा 50पेक्षा अधिक धावा केल्या आहेत, तर चार शतकी खेळी केल्या आहेत. त्यामुळे इडन गार्डन हे हिटमॅन रोहितसाठी खास आहे. आज होणाऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात त्याच्याकडून चौकार-षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी कोलकातातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.