Join us  

IND Vs WI One Day : 18 वर्षीय पृथ्वी शॉचे प्रमोशन, रोहित शर्मासोबत सलामीची संधी?

IND Vs WI One Day: कसोटी पदार्पणातच शतकी खेळी साकारणाऱ्या पृथ्वी शॉचे लवकरच प्रमोशन होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावीत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 11:54 AM

Open in App
ठळक मुद्देपृथ्वीने 22 लिस्ट A क्रिकेट सामन्यांत 42.33 च्या सरासरीने 938 धावा केल्या आहेत.

मुंबई : कसोटी पदार्पणातच शतकी खेळी साकारणाऱ्या पृथ्वी शॉचे लवकरच प्रमोशन होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावीत केले. त्याला मालिकावीराच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले. भारताने ही मालिका 2-0 अशी सहज खिशात घातली. 21 ऑक्टोबरला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात पृथ्वीला संधी मिळाली नसली तरी उर्वरित तीन सामन्यांत त्याचा समावेश केला जाऊ शकते. तसे झाल्यास तो उपकर्णधार रोहित शर्मासह सलामीला उतरू शकतो.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांची एक बैठक झाली. त्यात पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता संघात सतत बदल करत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ''विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन संघात खेळाडूंना रोटेट केले जाणार आहे. महत्त्वाच्या खेळाडूंना पुरेसा आराम मिळावा, हा यामागचा हेतू आहे. त्यामुळेच जस्प्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी यांना संघात आत-बाहेर केले जात आहे.  तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी हे खेळाडू महत्त्वाचे आहेत. पुढेही ही रोटेशन पद्धत कायम राखण्यात येणार आहे,''अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

भारतीय वन डे संघात रोहित शर्मा आणि शिखर धवन ही सलामीची जोडी ठरलेली आहे. मात्र, त्यातही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या उर्वरित तीन वन डे साठी शिखरला विश्रांती देऊन पृथ्वीला संधी मिळू शकते. पृथ्वीने 22 लिस्ट A क्रिकेट सामन्यांत 42.33 च्या सरासरीने 938 धावा केल्या आहेत. स्थानिक वन डे सामन्यांत त्याच्या नावावर पाच अर्धशतक आणि तीन शतकांचा समावेश आहे. भारत A संघाच्या इंग्लंड दौऱ्यावर त्याने वन डे सामन्यांत 58.33 च्या सरासरीने 353 धावा केल्या होत्या. 

टॅग्स :पृथ्वी शॉरोहित शर्माबीसीसीआय