Join us  

IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला मुंबईतील ट्वेंटी-20 सामना दुसरीकडे हलवणार?

वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:44 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे. कोलकाताच्या इडन गार्डनवर डे नाइट कसोटी होणार आहे आणि त्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. या मालिकेतील हा अखेरचा सामना आहे आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यासाठीची टीम इंडिया आज निवडली जाणार आहे, परंतु तत्पूर्वी या मालिकेतील एका सामन्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या मालिकेतील पहिला ट्वेंटी-20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पण, आता तो सामना होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.  

बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारतात तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या दौऱ्याला 6 डिसेंबर पासून ट्वेंटी-20 सामन्यानं सुरुवात होणार आहे. पहिला ट्वेंटी-20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पण, मुंबई पोलिसांनी या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास अडचण होईल, असे सांगितले आहे. 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्यामुळे मुंबईतील बहुतेक पोलीस त्या ड्युटीवर असणार आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्या इतके पोलीस मुंबई पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगितले आहे. शिवाय अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर 6 डिसेंबरला तणाव निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यात महापरिनिर्वाण दिवस असल्यानं पोलिसांवर प्रचंड ताण असणार आहे. ''मुंबई पोलिसांच्या प्रतिनिधिंनी आम्हाता वस्तुस्थितीची कल्पना दिली. याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर हा सामना होईल की नाही, हे स्पष्ट होईल,''असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

विंडीज मालिकेचे वेळापत्रक

ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - मुंबई8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - हैदराबाद

वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक   

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजबीसीसीआयमुंबई पोलीस