हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी लढत शुक्रवारपासून हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. या लढतीसाठी भारतीय संघाने बुधवारी कसून सराव केला. या सराव सत्रात भारतीय चमूत दाखल झालेल्या नव्या भिडूचीच चर्चा दिवसभर रंगली होती. हा नवा भिडू म्हणजे एक नवीन मशीन आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या विषयीचे ट्विट पोस्ट केले आहे.
ही फिल्डींग ड्रिल मशीन असून बॉलिंग मशीनची ती छोटी आवृत्ती आहे. ही मशीन चेंडू जमिनीलगत वेगाने फेकते आणि त्याने खेळाडूंची कॅचिंग प्रॅक्टीस होत आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनाही या मशीनची बरीच मदत होत आहे.
बीसीसीआयने या मशीनचा संपूर्ण व्हिडीओ वेबसाईटवर टाकला आहे. त्यात कर्णधार विराट कोहली आणि पृथ्वी शॉ या मशीनच्या मदतीने कॅच प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. या मशीनबद्दल श्रीधर यांनी सांगितले की,''या नव्या भिडूला मी संघातील अन्य खेळाडूंसह रुळवतो आहे. ही एक कॅचिंग मशीन आहे, ज्याच्या मदतीने आम्हाला स्लिपमध्ये कॅच घेण्याचा सराव मिळत आहे."