India vs West Indies 5th T20I : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आणखी एक ट्वेंटी-२० मालिका जिंकली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात ८८ धावांनी विजय मिळवून मालिका ४-१ अशी खिशात घातली. विशेष म्हणजे या सामन्यात सर्वच्या सर्व १० विकेट्स या भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. रवी बिश्नोईने ( ४-१६), कुलदीप यादव ( ३-१२) व अक्षर पटेल ( ३-१५) यांनी फिरकीच्या तालावर विंडीजला नाचवले आणि संपूर्ण संघ १०० धावांत माघारी पाठवला. या विजयानंतर रोहित शर्माने संघातील खेळाडूंना गोल्फ कार वरून स्टेडियमची फेरी मारून आणली. रोहितचा ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६४ धावा केल्या. त्याने ८ चौकार व २ षटकार खेचले. रोहित शर्माला या सामन्यात विश्रांती दिली गेल्याने हार्दिक पांड्याने नेतृत्व केले. दीपक हुडाने २५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३८ धावा चोपल्या. हार्दिकनेही १६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांच्या मदतीने २८ धावा करताना संघाला ७ बाद १८८ धावांपर्यंत नेले. विंडीजच्या ओडीन स्मिथने तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात विंडीजकडून शिमरोन हेटमायर ( ५०) एकटा खेळला. अन्य फलंदाज अपयशी ठरले. विंडीजचा संपूर्ण संघ १५.४ षटकांत १०० धावांत तंबूत परतला.
रोहित, हार्दिक व सुरेश रैना या तिघांनाच त्यांच्या कर्णधारपदाच्या सुरुवातीच्या तीनही ट्वेंटी-२० लढती जिंकता आल्या आहेत. २०२२मधील भारताने सर्वाधिक १६ ट्वेंटी-२० सामने जिंकले आहेत.