Join us  

IND vs SL, 2nd Test Live Updates : Jasprit Bumrah ची विक्रमी कामगिरी, श्रीलंकेची पहिल्या डावात हाराकिरी; भारताकडे मजबूत आघाडी

जसप्रीतने भारतात कसोटीत प्रथमच डावात पाच विकेट्स घेतल्या. एकूण त्याने ८ वेळा असा पराक्रम केला आणि ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३०० वी विकेट ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 2:33 PM

Open in App

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates :  टीम इंडियाचे आघाडीचे चार प्रमुख फलंदाज ८६ धावांवर माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) ने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. श्रेयसच्या ९२ धावांच्या खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या आणि त्यानंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) , मोहम्मद शमी आणि पुनरागमन करणाऱ्या अक्षर पटेल यांनी कमाल केली. पहिल्या दिवसअखेर श्रीलंकेचे ६ फलंदाज ८६ धावांवर माघारी पाठवले आणि दुसऱ्या दिवसात त्यांचे उर्वरित चार फलंदाज अवघ्या २३ धावांची भर घालून माघारी परतले. जसप्रीत बुमराहने या डावात विक्रमी कामगिरी केली. 

मयांक अग्रवाल ( ४), रोहित शर्मा ( १५), हे झटपट माघारी गेल्यानंतर विराट कोहली ( ३१) व हनुमा विहारी ( २३) यांनी संघर्ष दाखवला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. रिषभ पंतने २६ चेंडूंत ७ चौकारांसह ३९ धावा केल्या. त्यानंतर श्रेयसने दमदार खेळ केला. त्याने रिषभसह ४० ( ३१ चेंडू), जडेजासह २२ ( २४ चेंडू), आर अश्विनसह ३५ ( ६३ चेंडू) आणि अक्षर पटेलसह  ३२ ( १७ चेंडू) धावांची भागीदारी केली. श्रेयस ९८ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ९२ धावांवर यष्टिचीत झाला. भारताचा पहिला डाव २५२ धावांवर गडगडला.     

प्रत्युत्तरात उतरलेल्या  श्रीलंकेला तिसऱ्या षटकात धक्का बसला. जसप्रीतने सलामीवीर कुसल मेंडिसचा ( २) त्रिफळा उडवला. त्यापाठोपाठ कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( ४), लाहिरू थिरीमाने ( ८), धनंजय ( १०) व चरिथ असलंका ( ५) हे बाद झाले. अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज खिंड लढवताना दिसला, परंतु जसप्रीतने त्याला माघारी पाठवले. मॅथ्यूज ४३ धावांवर बाद झाला आणि श्रीलंकेने पहिल्या दिवसअखेर ६ बाद ८६ धावा केल्या होत्या. त्यात ११ धावांची भर पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ वी विकेट पडली. जसप्रीतच्या भन्नाट बाऊन्सरवर लसिथ एम्बूल्देनिया ( १)  बाद झाला. सुरंगा लकमलही ५ धावा करून आर अश्विच्या कॅरम बॉलवर त्रिफळाचीत झाला. अश्विनची ही ४३७ वी कसोटी विकेट ठरली आणि डेल स्टेन याचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी दोन बळी टिपायचे आहेत.  

जसप्रीतने आणखी एक बाऊन्सर टाकून श्रीलंकेसाठी संघर्ष करणाऱ्या निरोशान डिकवेलाला ( २१) बाद केले.  या विकेटसह जसप्रीतने भारतात कसोटीत प्रथमच डावात पाच विकेट्स घेतल्या. एकूण त्याने ८ वेळा असा पराक्रम केला आणि ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३०० वी विकेट ठरली. अश्विनने आणखी एक विकेट घेत श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळून भारताला पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. जसप्रीतने २४ धावांत ५ विकेट्स घेतल्या. अश्विन व मोहम्मद शमीने दोन आणि अक्षरने एक विकेट घेतली.   

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाजसप्रित बुमराहआर अश्विन
Open in App