India vs South Africa, 2nd Test Live Updates : अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीनंतर हनुमा विहारीच्या नाबाद ४० आणि शार्दूल ठाकूरच्या २८ धावांच्या जोरावर भारतानं दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर गडगडला. कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी व मार्को जॅन्सेन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. फलंदाजीतही आफ्रिकेकडून सुरेख खेळ झालेला पाहायला मिळाला. तिसऱ्या दिवसअखेर कर्णधार डीन एल्गरनं संघर्ष करताना संघाला शतकी पल्ला पार करून दिला होता. त्यामुळे चौथ्या दिवशी कोण बाजी मारतं याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पण, मुसळधार पावसामुळे चौथ्या दिवसातील पहिले सत्र वाया घालवले. अजूनही पाऊस सुरूच आहे आणि आजच्या दिवसाचा खेळ कधी सुरू होईल, याबाबत साशंकता आहे.
भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांवर गडगडला. शार्दूल ठाकूरनं ६१ धावांत ७ विकेट्स घेतल्या. भारताच्या दुसऱ्या डावात लोकेश ( ८ ) व मयांक ( २३ ) यांना अनुक्रमे मार्को जॅन्सेन व ऑलिव्हर यांनी बाद केले. चेतेश्वर पुजारानं ८६ चेंडूंत ५३ आणि अजिंक्य रहाणेनं ७८ चेंडूंत ५८ धावांची खेळी केली. रिषभ पंत चुकीचा फटका मारून शून्यावर बाद झाला. आर अश्विन व शार्दूल ठाकूर यांनी फलंदाजीत योगदान देताना अनुक्रमे १६ व २८ धावा केल्या. हनुमा विहारी एका बाजूनं विकेट टिकवून खेळला, परंतु भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर आटोपला. हनुमा विहारी ४० धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेला विजयासाठी २४० धावा करायच्या आहेत.
प्रत्युत्तरात डीन एल्गर व एडन मार्कराम यांनी आफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली. पण, पुन्हा एकदा शार्दूल ठाकूरनं भागीदारी तोडली. त्यानं मार्करामला ( ३१) पायचीत पकडले अन् आफ्रिकेला ४७ धावांवर पहिला धक्का दिला. एल्गर व किगन पीटरसन यांनी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या अन् आर अश्विननं आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. पीटरसन ४४ चेंडूंत २८ धावा करून पायचीत झाला. रिषभ पंत यष्टिंमागून स्लेजिंग करत होता, परंतु एल्गरची एकाग्रता तो भंग करू शकला नाही. बोटावर, हेल्मेटवर चेंडू आदळूनही एल्गर मजबूतीनं उभा राहिला. एल्गर व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांनी दिवसअखेर खिंड लढवताना आफ्रिकेला २ बाद ११८ धावांपर्यंत मजल मारून दिली होती. आफ्रिकेला विजयासाठी १२२ धावा करायच्या आहेत, तर भारताला ८ विकेट्स टिपायच्या आहेत.