दुबई, आशिया चषक 2018 : भारताने पुन्हा एकदा आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. सुपर फोर गटाच्या लढतीत भारताने ९ गडी व ६३ चेंडू राखून पाकिस्तानचा पराभव केला. भारताने या स्पर्धेत विजय मोहीम कायम राखत जवळजवळ अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. या सामन्यात शिखर धवनने कर्णधार रोहित शर्माच्या सोबतीने पहिल्या विकेटसाठी 210 धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यात धवनच्या 114 धावांचा समावेश होता. या शतकासह धवनने एक अनोखा विक्रम नावावर केला.
भारताच्या या डावखुऱ्या फलंदाजाने इंग्लंड दौऱ्यातील अपयश मागे टाकताना आशिया चषक स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ केला आहे. त्याने सलामीच्याच लढतीत हाँगकाँगविरुद्ध शतक झळकावले आहे. त्यापाठोपाठ त्याने रविवारी पाकिस्तानविरुद्ध 100 चेंडूंत 114 धावांची खेळी साकारली. आशिया चषक, विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांमध्ये दोन शतकं झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
2015च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत धवनने दोन शकतं झळकावली होती. विश्वचषक स्पर्धेत दोन शकत करणारा तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्यानंतरचा चौथा भारतीय फलंदाज ठरला होता. त्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो ( 337) सातव्या स्थानी होता.
2013च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत धवनने दोन शतकांसह स्पर्धेतील सर्वाधिक 363 धावा करण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर 2018च्या आशिया चषक स्पर्धेत त्याने दोन शतकं केली आहेत. त्याने युवराज सिंगच्या 14 वन डे शतकांचा विक्रमही मोडला.