Join us  

IND Vs NZ: इतिहास रचण्यापासून भारतीय संघ फक्त एक पाऊल दूर...

भारतीय संघ इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर असल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 5:38 PM

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ भन्नाट फॉर्मात आहे. न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यावर भारताने सलग दोन सामने जिंकले आहेत. आता तर भारतीय संघ इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर असल्याचे म्हटले जात आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं सुरेख सांघिक खेळ केला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं सात विकेट राखून हा सामना जिंकला. राहुलनं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करताना विजयात सिंहाचा वाटा उचलला. या विजयासह टीम इंडियानं पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी मजबूत आघाडी घेतली आहे.

सध्याच्या घडीला भारतीय संघ पहिल्यांदाच पाच सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका खेळत आहे. त्याचबरोबर या मालिकेत आता इतिहास रचण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत भारतीय संघाला जे न्यूझीलंडमध्ये करता आले नव्हते, ते करण्यापासून भारतीय संघ फक्त एक पाऊल दूर असल्याचे म्हटले जात आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना २९ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर त्यांना इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. आतापर्यंत भारताने या मालिकेत दोन सामने जिंकले आहेत आणि त्यांच्याकडे २-० अशी आघाडी आहे. भारताने जर तिसरा सामना जिंकला तर त्यांना ही मालिका जिंकता येणार आहे. आतापर्यंत भारताला न्यूझीलंडमध्ये एकदाही ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका जिंकता आलेली नाही.

भारताने २००८-०९ साली न्यूझीलंडचा दौरा केला होता. पण या दौऱ्याच्यावेळी न्यूझीलंडने ट्वेन्टी-२० मालिका २-० अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघ २०१८-१९ या साली न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात भारताने न्यूझीलंडमध्ये पहिला ट्वेन्टी-२० सामना जिंकला होता. पण भारताला मालिका जिंकता आली नव्हती. न्यूझीलंडने तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली होती. त्यामुळे भारताला हा सामना जिंकून मालिका विजयासह इतिहास रचण्याची नामी संधी आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड