Join us  

IND vs NZ, 2nd Test Live Update : १६ विकेट्सनं गाजला मुंबई कसोटीचा दुसरा दिवस; एजाझ पटेलच्या विक्रमानंतरही भारतीय संघाचे सामन्यावर वर्चस्व

India vs New Zealand, 2nd Test Live Update : विराट कोहलीच्या पुनरागमनानं टीम इंडियाच्या ताफ्यात आक्रमकता आली... गोलंदाजांचे मनोबल उंचावताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना डिवचणारा विराट पुन्हा मैदानावर पाहून चाहतेही आनंदात दिसले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 5:23 PM

Open in App

India vs New Zealand, 2nd Test Live Update : विराट कोहलीच्या पुनरागमनानं टीम इंडियाच्या ताफ्यात आक्रमकता आली... गोलंदाजांचे मनोबल उंचावताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना डिवचणारा विराट पुन्हा मैदानावर पाहून चाहतेही आनंदात दिसले. एजाझ पटेलनं ( Ajaz Patel) टीम इंडियाच्या सर्व शिलेदारांना माघारी पाठवल्यानंतर विराटनं भारतीय गोलंदाजांचा उत्साह वाढवला अन् किवींचा पहिला डाव २८.१ षटकांत गडगडला. भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. आज दिवसभर भारताच्या ६ व न्यूझीलंडच्या १० अशा १६ विकेट्स पडल्या आणि त्यापैकी १३ विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या.

४ बाद २२१ वरून भारतानं आज डावाची सुरूवात केली. परंतु दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात एजाझनं सहाला ( २७) पायचीत केलं अन् पुढच्याच चेंडूवर आर अश्विनला त्रिफळाचीत केलं. अक्षर व  मयांक यांनी सातव्या विकेटसाठी दमदार खेळ केला.  मयांक ३११ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांसह १५० धावांवर एजाझच्या गोलंदाजीवर माघारी परतला.  अक्षरनं ११३ चेंडूंत कसोटीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण, एजाझनं पुन्हा खोडा घातला, अक्षरला ५२ धावांवर पायचीत केले. त्यानंतर जयंत यादव व मोहम्मद सिराज यांची विकेट घेत एजाझनं इतिहास रचला.  भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर गुंडाळला.   एजाझनं ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या. त्यानं १२ निर्धाव षटकंही फेकली.  केन विलियम्सनची उणीव न्यूझीलंडला प्रकर्षानं जाणवली. इशांत शर्माच्या जागी संघात स्थान पटकावलेल्या मोहम्मद सिराजनं पहिल्या स्पेलमध्ये ४ षटकांत १९ धावा देताना तीन विकेट्स घेतल्या. विल यंग, टॉम लॅथम व रॉस टेलर हे आघाडीचे फलंदाज माघारी पाठवून सिराजनं टीम इंडियासाठी विजयाचे दार उघडले. त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी कमाल केली. अक्षर पटेल व जयंत यादव धक्के देतच होते, परंतु अनुभव आर अश्विननं किवी फलंदाजांना गुंडाळले. किवींचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. आशियाई देशाविरुद्ध किवींची ही निचांक कामगिरी ठरली. भारतानं पहिल्या डावात २६३ धावांची आघाडी घेतली. आर अश्विननं ८ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनं १९ धावांत ३, तर अक्षर पटेलनं १४ धावांत २ बळी टिपले. जयंत यादवनं एक विकेट घेतली.

आर अश्विननं न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत भारतीय गोलंदाज म्हणून सर्वाधिक ६२ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर बिशन सिंग बेदी ( ५७), इरापल्ली प्रसन्ना ( ५५), अनिल कुंबळे ( ५०) व जहीर खान ( ४७) यांचा क्रमांक येतो.  दरम्यान, क्षेत्ररक्षण करताना शुबमन गिल याच्या बोटाला चेंडू लागल्यानं  चेतेश्वर पुजारा व मयांक अग्रवाल ही जोडी सलामीला आली आहे. या दोघांनी दुसऱ्या दिवसाचे अखेरचे सत्र सहज खेळून काढताना बिनबाद ६९ धावा केल्या. भारतानं दुसऱ्या दिवसअखेर ३३२ धावांची आघाडी घेतली आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडआर अश्विनमोहम्मद सिराजमयांक अग्रवाल
Open in App