अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये कसोटी कर्णधारपदाची सुरुवात करणारा शुभमन गिलने लॉर्ड्स वगळता दोन्ही कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. या मालिकेत त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा इंग्लंडमधील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आहे. या मालिकेतील अजून दोन सामने खेळायचे आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी गिलने लॉर्ड्समध्ये केलेल्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. मांजरेकर यांनी शुभमन गिलला विराट कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, अशा इशारा दिला आहे.
संजय मांजरेकर जिओ हॉटस्टारवर म्हटले आहे की, "लॉर्ड्स सामन्यात शुभमन गिल मैदानावर इंग्लंडच्या खेळाडूंशी ज्या प्रकारे भिडला, त्यामुळे फलंदाजी करताना त्याची एकाग्रता बिघडली. विशेषतः लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचे सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांच्याशी झालेल्या वादाचा त्याच्यावर उलटा परिणाम झाला. चौथ्या दिवशी गिल फलंदाजीसाठी आला, पण तो सुरुवातीपासूनच संर्घष करताना दिसला. गेल्या सामन्यात २६९ आणि १६१ धावा काढणारा हा तोच गिल का, यावर विश्वास बसेना. नाणेफेक गमावल्यानंतर तो ९ धावांवर बाद झाला. त्याने विराट कोहली बनण्याचा प्रयत्न करू नये, जे त्याला नैसर्गिकरित्या शोभत नाही."
पुढे मांजरेकर म्हणाले की, "विराट कोहलीला प्रतिस्पर्ध्यांचा सामना करायला आवडते आणि ही त्याची खासियत होती. जर कोहली लॉर्ड्स कसोटीत असता आणि त्या परिस्थितीत फलंदाजीला आला असता तर त्याने दुसऱ्या डावात शतक झळकावले असते. पण गिल फलंदाजी करताना खूप घाबरलेला दिसत होता आणि तो त्याच्या नैसर्गिक शैलीच्या विरुद्ध खेळत होता."