Ind Vs Eng test Match live : जॉनी बेअरस्टोने ( Jonny Bairstow) आणखी एक शतकी खेळी करताना टीम इंडियाला कडवी टक्कर दिली. इंग्लंडचा निम्मा संघ ८३ धावांवर माघारी परतल्यानंतर भारताने सामन्यावर मजबूत पकड घेतली होती. बेअरस्टो व कर्णधार बेन स्टोक्स या जोडीने इंग्लंडच्या डावाला आकार दिला. त्यानंतर बेअरस्टोने सॅम बिलिंग्ससह अर्धशतकी भागीदारी करून फॉलोऑनची नामुष्की टाळली. मोहम्मद शमीने भारताला बेअरस्टोची विकेट मिळवून दिली. त्यानंतर मोहम्मद सिराजने इंग्लंडचे शेपूट गुंडाळले.
टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा निम्मा संघ ८४ धावांवर माघारी परतला होता. अॅलेक्स लीज ( ६), झॅक क्रॅवली ( ९) व ऑली पोप ( १०) यांना बुमराहने बाद केले. त्यानंतर
मोहम्मद सिराजने महत्त्वाची विकेट घेताना जो रूटला ६७ चेंडूंत ३१ धावांवर बाद केले. मोहम्मद शमीने नाईट वॉचमन जॅक लिचला ( ०) माघारी पाठवले. ५ बाद ८४ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या इंग्लंडने दमदार फटकेबाजी केली. जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी ७५ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. स्टोक्स २५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर बेअरस्टो व सॅम बिलिंग्स यांनी ४९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली.
पावसाने पुन्हा एकदा खोडा घातल्याने लंच ब्रेक आधीच घ्यावा लागला. सायंकाळी ६ वाजता दिवसाचे दुसरे सत्र सुरू झाले तेव्हा बिलिंग्सने चौकाराने सुरुवात केली. या लढतीत विराटसोबत त्याचा वाद झाला अन् त्यानंतर बेअरस्टोने गिअर बदलला. ६३ चेंडूंत केवळ १३ धावा करणाऱ्या बेअरस्टोने पुढे ११९ चेंडूंत १०० पूर्ण केले. म्हणजे त्याने ८७ धावा या ५६ चेंडूंत चोपून काढल्या. बेअरस्टोने कसोटीतील पाचवे शतक झळकावताना इंग्लंडवरील फॉलोऑनची नामुष्कीही दूर केली. बेअरस्टो १४० चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०६ धावांवर बाद झाला.
त्यानंतर मोहम्मद सिराजने दोन धक्के दिले आणि स्टुअर्ट ब्रॉड ( १) व सॅम बिलिंग्स ( ३६) यांना माघारी पाठवले. सिराजने डावातील चौथी विकेट घेतली अन् इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. भारताने पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली.