१७ चौकार, ४ षटकार! दीडशे धावा करून यशस्वी जैस्वालचा पराक्रम; थेट ख्रिस गेलशी बरोबरी

IND vs ENG 2nd Test Live Scorecard : यशस्वी जैस्वालाने विशाखापट्टणमचे मैदान गाजवले आहे. दोन महत्त्वाच्या विकेट गमावल्यानंतर यशस्वीने इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 03:42 PM2024-02-02T15:42:54+5:302024-02-02T15:43:38+5:30

whatsapp join usJoin us
ind vs Eng 2nd test live score board  : 150 up for Yashasvi Jaiswal as he is carrying India's batting line-up on his shoulders against England in Vizag | १७ चौकार, ४ षटकार! दीडशे धावा करून यशस्वी जैस्वालचा पराक्रम; थेट ख्रिस गेलशी बरोबरी

१७ चौकार, ४ षटकार! दीडशे धावा करून यशस्वी जैस्वालचा पराक्रम; थेट ख्रिस गेलशी बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 2nd Test Live Scorecard  ( Marathi News) :  यशस्वी जैस्वालाने विशाखापट्टणमचे मैदान गाजवले आहे. दोन महत्त्वाच्या विकेट गमावल्यानंतर यशस्वीने इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप दिला आणि टॉम हार्टलीला षटकार खेचून शतक पूर्ण केले. त्याने श्रेयस अय्यर व रजत पाटीदार यांच्यासह महत्वपूर्ण भागीदारी करून भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. यशस्वीने दीडशे धावा पूर्ण करून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. 


रोहित शर्मा ( १४ ) व शुबमन गिल ( ३४ ) यांना अनुक्रमे शोएब बशीर व जेम्स अँडरसन यांनी माघारी पाठवून भारताला धक्के दिले. पण, यशस्वी जैस्वालने आक्रमक फटकेबाजी करताना कसोटीतील दुसरे शतक पूर्ण केले. लंच ब्रेकनंतर यशस्वीने धावांची गती वाढवताना श्रेयस अय्यरसह ( २७) तिसऱ्या विकेटसाठी १३१ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. टॉम हार्टलीच्या एकाच षटकात यशस्वीने सलग तीन चौकार खेचले आणि त्यानंतर बशीरला टार्गेट केले. यशस्वीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडला. यापैकी ५०० धावा या त्याने ६ कसोटींत ५५.६७च्या सरासरीने चोपल्या आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ मध्ये ५०० धावा करणारा तो पहिला भारतीय आणि पहिला आशियाई फलंदाज ठरला. 
 


२२व्या वर्षी घरी व परदेशातक कसोटीत शतक झळकावणारा तो रवी शास्त्री व सचिन तेंडुलकर यांच्यानंतरचा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. भारताने पहिल्या सत्रात ३३ षटकांत १०३ धावांत २ विकेट्स गमावल्या, तर दुसऱ्या सत्रात ३१ षटकांत १२२ धावा चोपल्या. इंग्लंडला या सत्रात एकच विकेट घेता आली. यशस्वी व पदार्पणवीर रजत पाटीदार यांनी ते सत्र गाजवले, परंतु चहापानाच्या ब्रेकनंतर रजतची विकेट पडली. रेहान अहमदच्या गोलंदाजीवर रजत दुर्दैवीरित्या बाद झाला. त्याच्या बॅटला लागून चेंडू यष्टींवर आदळला. यशस्वी व रजत यांनी १२४ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. रजतने ७२ चेंडूंत ३२ धावांची संयमी खेळी केली.


यशस्वी शड्डू ठोकून उभाच राहिला आणि त्याने चौकाराने दीडशे धावा पूर्ण केल्या. भारतीय खेळपट्टीवर कसोटीत १५० धावा करणारा तो ( २२ वर्ष व ३६ दिवस) तिसरा युवा फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकरने १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध १९ वर्ष व २९३ दिवसांचा असताना आणि विनोद कांबळीने १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्धच २१ वर्ष व ३२ दिवसांचा असताना असा पराक्रम केला होता. २२ किंवा त्याहून कमी वयात सलामीवीर म्हणून दोनवेळा १५०+ धावा करण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी आज यशस्वीने बरोबरी केली. हे वृत्त लिहिताना यशस्वीने २३२ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १६० धावा केल्या होत्या आणि भारताच्या ८० षटकांत ४ बाद २८७ धावा झालेल्या. 

Web Title: ind vs Eng 2nd test live score board  : 150 up for Yashasvi Jaiswal as he is carrying India's batting line-up on his shoulders against England in Vizag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.