भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या नाणेफेकीला आता काही वेळ उरला आहे. दरम्यान, तिसऱ्या कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडू निवडताना कर्णधार रोहित शर्माची कसोटी लागणार आहे.
याचं कारण म्हणजे विराट कोहली, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर सारखे खेळाडू उपलब्ध नसल्याने टीम इंडियाचं संतुलन बिघडलं आहे. विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे आणि श्रेयस अय्यरने दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून माघार घेतली आहे. तर लोकेश राहुल चौथ्या कसोटीमधून पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फायदा देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार फलंदाज सर्फराज खान याला मिळू शकतो. त्याला अंतिम संघात स्थान मिळू शकतं, असं घडल्यास हा त्याच्यासाठी पदार्पणाचा सामना ठरु शकतो. त्याचप्रमाणे यष्टीरक्षक के.एस. भरत हा फॉर्ममध्ये नाही आहे. अशा परिस्थितीत यष्टिरक्षक ध्रुव जुरेल याला संधी मिळू शकतो. हा जुरेलचा पदार्पणाचा सामना ठरू शकतो. अशा परिस्थितीत राजकोट कसोटीत भारतीय संघातून दोन खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते.
दुसरीकडे मागच्या कसोटीला मुकलेला अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीनंतर पुनरागमन करताना दिसत आहे. जडेजा या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. जडेजाचं संघात पुनरागमन झाल्यास अक्षर पटेल किंवा कुलदीप यादव यापैकी एकाला संघाबाहेर बसावं लागणार आहे. तसेच जसप्रीत बुमराहच्या खेळण्याची शक्यताही खूप कमी आहे. काही रिपोर्टमध्ये सांगितले की, या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र काही बातम्यांनुसार सरावाशिवायच बुमराह या सामन्यात खेळणार आहे.
भारतीय संघ रोहिश शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटिदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल/के.एस. भरत (यष्टिरक्षक), आर. अश्विन, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह/मुकेश कुमार आणि मोहम्मद शमी.
इंग्लंडचा संघ जॅक क्रॉवली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.