Join us  

IND vs AUS Test : तिसऱ्या सामन्यात कोणी ओपनिंग करावी? संजय मांजरेकर यांनी सोडवला यक्षप्रश्न

तिसऱ्या सामन्यासाठी कोणी ओपनिंग करायची, हा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. या प्रश्नाचे उत्तर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 2:22 PM

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताला पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सलामीची समस्या जाणवत आहे. दोन्ही सामन्यांत लोकेश राहुल आणि मुरली विजय चांगली सलामी देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यासाठी कोणी ओपनिंग करायची, हा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. या प्रश्नाचे उत्तर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी दिले आहे.

दुसऱ्या सामन्यात जिथे ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली होती. तिथे भारताच्या सलामीवीरांना दोन्ही डावात मिळून 50 धावाही काढता आल्या नव्हत्या. पण ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी पहिल्या डावात शतकी आणि दुसऱ्या डावात अर्धशतकी सलामी दिली होती. त्यामुळे आता या दोन्ही सलामीवीरांना डच्चू द्यावा, अशी भावना चाहत्यांच्या मनात आहे. पृथ्वी शॉ याला पहिल्या सामन्यापूर्वी सराव करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो आगामी दौऱ्यात खेळू शकणार नाही. दुसरीकडे रोहित शर्माही वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतणार आहे. त्यामुळे भारतीय संघापुढे सलामीचा यक्षप्रश्न उभा राहिल्याचे म्हटले जात आहे. पण मांजरेकर यांनी हा प्रश्न सहजपणे सोडवला आहे.

मांजरेकर यांनी म्हटले आहे की, " दुसऱ्या सामन्यासाठी राहुल आणि विजय या दोघांनाही संघाबाहेर काढायला हवे. तिसऱ्या सामन्यासाठी सलामीवीर म्हणून मयांक अगरवालचे संघात आगमन झाले आहे. त्यामुळे त्याला सलामीची संधी द्यावी. त्याचबरोबर मयांकच्या जोडीला अष्टपैलू हनुमा विहारीला सलामीची संधी द्यायला हवी. कारण त्याची फलंदाजी पाहिल्यावर तो चांगली सलामी देऊ शकतो, असे दिसत आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी मयांक आणि हनुमा यांनी सलामीला यायला हवे. "

पर्थ कसोटीतील पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरी बरोबरच कर्णधार विराट कोहलीचा आक्रमकपणा हा चर्चेचा विषय राहिला. कोहलीच्या या आक्रमकतेवर भारताचा माजी कसोटीपटू संजय मांजरेकरसह ऑस्ट्रेलियाचे दिग्गज अॅलन बॉर्डर, माईक हसी आणि मिचेल जॉन्सन यांनी टीका केली. मात्र, भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याने कोहलीला मैदानावरील आक्रमकता कायम राखण्याचा सल्ला दिला. 

तो म्हणाला,''कोहलीला मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा सल्ला देतो. यशस्वी होण्यासाठी कोहलीला जे प्रेरीत करते ते त्याने करावे. त्याने यशस्वी मंत्र सोडू नये. मग त्याने लोक काय म्हणतात याचा विचार करूच नये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असेच राहावे लागते.'' भारताचा आणखी एक माजी गोलंदाज प्रविण कुमारनेही झहीरच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली आहे. तो म्हणाला,'' अंडर 16, अंडर 19 आणि रणजी करंडक स्पर्धेतही कोहली याच आक्रमकतेने खेळतो. मग भारताकडून खेळताना त्याने ती आक्रमकता कायम राखली तर त्यात गैर काय? त्याच्यासोबत मी बरेच सामने खेळलो आहे आणि आक्रमकतेशिवाय तो उत्तम खेळ करूच शकत नाही.''  

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत 146 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामुरली विजय