नवी दिल्ली : ‘भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या तडाख्यातून वाचण्यासाठी त्याला सरळ चेंडू टाकण्याऐवजी लेग स्टम्प किंवा आॅफ स्टम्पच्या बाहेर मारा करावा,’ असा सल्ला दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नने गोलंदाजांना दिला आहे.
वॉर्न म्हणाला,‘जर तुम्ही विराटला गोलंदाजी करीत असाल तर डाव्या यष्टीवर किंवा उजव्या यष्टीच्या बाहेर मारा करताना क्षेत्ररक्षणही तसेच सजवायचे. त्याला तुम्ही सरळ मारा करू शकत नाही. तो मैदानाच्या दोन्ही बाजूला फटके खेळू शकतो. आपल्याला मैदानाच्या एका भागावर अधिक लक्ष द्यावे लागेल. कुठल्याही चांगल्या फलंदाजाला तुम्ही मैदानाची एक बाजू सांभाळून गोलंदाजी करायला हवी.’
वॉर्नने कोहलीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानले नसले तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्यासारखा वर्चस्व गाजवणारा खेळाडू बघितला नसल्याचे त्याने म्हटले आहे. वॉर्न म्हणाला,‘विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडू आहे का, असा प्रश्न मला वारंवार विचारला जातो. तो सचिन व लारा यांच्यापेक्षा सरस आहे का, अशीही विचारणा होते. मी मात्र याबाबत विचार करीत असून उत्तराचा शोध घेत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटप्रमाणे वर्चस्व गाजवणारा कुठलाही खेळाडू बघितलेला नाही. डॉन ब्रॅडमन सर्वोत्तम होते, पण कोहली त्यांच्या समीप पोहोचलेला नाही. मी जेवढे क्रिकेट बघितले त्यात व्हिव्ह रिचर्ड््स सर्वोत्तम होते. ज्या खेळाडूंविरुद्ध मी खेळलो त्यात लारा व तेंडुलकर सर्वोत्तम होते.’ (वृत्तसंस्था)
कोहलीने २०१६ पासून ५९ एकदिवसीय डावांमध्ये ३९८५ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही शानदार आहे. त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध रांची येथे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील ४१ वे शतक झळकावले. तो सचिनच्या विक्रमी ४९ शतकांपासून ८ शतके दूर आहे.