India vs Australia, 4th Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाला दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे धक्क्यांवर धक्के बसले आहेत. दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी इशांत शर्मा व भुवनेश्वर कुमार यांना माघार घ्यावी लागली. रोहित शर्मालाही दुखापतीमुळे वन डे, ट्वेंटी-20 मालिका आणि पहिल्या दोन कसोटींना मुकावे लागले. त्यानंतर मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी अशी दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच गेली. चौथ्या कसोटीत उर्वरित खेळाडूंमधून अंतिम ११ खेळाडू घेऊन टीम इंडिया मैदानावर उतरली, परंतु पहिल्या दिवशीच पुन्हा दुखापतीचं भूत मानगुटीवर बसलं. जलदगती गोलंदाज नवदीप सैनी ( Navdeep Saini) यानं दुखापतीमुळे मैदान सोडलं आणि तो आता दुसऱ्या डावातही मैदानावर उतरेल याची शक्यता फार कमी आहे.
चौथ्या कसोटीत सर्वात कमी अनुभव असलेल्या गोलंदाजांची फौज घेऊन टीम इंडिया मैदानावर उतरली. मोहम्मद सिराज ( २ कसोटी), नवदीप सैनी व शार्दूल ठाकूर ( प्रत्येकी १ कसोटी), टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांचे पदार्पण... तरीही टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर गुंडाळला. पण, नवदीप सैनीच्या दुखापतीनं त्यांचं टेंशन वाढवलं. ७.५ षटकं टाकून सैनी मैदानाबाहेर गेला. त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे वृत्त बीसीसीआयनं दिले. तो दुसऱ्या डावात मैदानावर उतरेल की नाही, याबाबतही साशंकता आहे.
ANI नं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयची वैद्यकिय टीम सैनीच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे आणि दुसऱ्या डावात तो मैदानावर उतरेल यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, गोलंदाजांच्या कौतुकास्पद कामगिरीनंतर टीम इंडियाच्या फलंदाजांची जबाबदारी होती. शुबमन गिल व रोहित यांनी सावध सुरुवात केली. पण, पॅट कमिन्सच्या चेंडूचा वेगाचा अंदाज बांधण्यास गिल चुकला अन् स्टीव्ह स्मिथनं स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. रोहित व चेतेश्वर पुजारा ही जोडी चांगलीच जमली होती. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या, परंतु अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या रोहितला मोठा फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही. लियॉनचा चेंडू सीमापार मारण्याच्या प्रयत्नात मिचेल स्टार्कच्या हाती झेल देऊन रोहित माघारी परतला. त्यानं ७४ चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावा केल्या. चहापानापर्यंत भारताच्या २ बाद ६२ धावा झाल्या आहेत. पावसामुळे खेळ थांबला आहे.