ठळक मुद्दे'बॉक्सिंग डे' कसोटीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी मंगळवारी संघ जाहीर केले. यजमान ऑस्ट्रेलियाने संघात एकच बदल केला, तर भारताने आपल्या दोन्ही सलामीवीरांना बाकावर बसवले.
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 'बॉक्सिंग डे' कसोटीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी मंगळवारी संघ जाहीर केले. यजमान ऑस्ट्रेलियाने संघात एकच बदल केला, तर भारताने आपल्या दोन्ही सलामीवीरांना बाकावर बसवले. लोकेश राहुल आणि मुरली विजय यांच्याजागी संघात मयांक अग्रवाल आणि रवींद्र जडेजा यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सलामीला कोण येणार, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांसमोर उभा राहिला आहे. मयांकचे सलामीला येणे पक्के आहे, परंतु त्याच्या जोडीला रोहित शर्मा किंवा हनुमा विहारी यांना संधी मिळू शकते, असे संकेत निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दिले.
राहुल आणि विजय यांना या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत मिळून 95 धावाच करता आल्या आहेत. त्याशिवाय या जोडीने मागील अकरा डावांमध्ये 15 च्या सरासरीने 166 धावा केल्या आहेत. यात केवळ एकच अर्धशतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे त्यांना अखेरीस डच्चू देण्यात आला. त्यामुळे मेलबर्न कसोटीत मयांक आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण करणार आहे. मयांकला सलामीला संधी मिळणार हे निश्चित आहे, परंतु त्याच्या जोडीचा प्रश्न अनुत्तरीत आहे. प्रसाद यांनी सांगितले,''हनुमाची कामगिरी चांगली झालेली आहे आणि तो सलामीची जबाबदारी योग्यरितीने पार पाडू शकतो. मात्र, तो दीर्घकालीन पर्याय असू शकत नाही.''
प्रसाद यांच्या या वक्तव्याने रोहितही सलामीला येण्याचे संकेत मिळत आहेत. सलामीला आणखी एक पर्याय उभा राहत आहे. चांगल्या फॉर्मात असलेला चेतेश्वर पुजाराल बढती मिळू शकते.