ठळक मुद्देभारताचा विजय लांबणीवर, पाचव्या दिवशी हव्यात दोन विकेटपॅट कमिन्सची नाबाद 61 धावांची खेळी
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. पाचव्या दिवशी त्यांना केवळ 2 विकेट घेऊन विजयाची औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे 8 फलंदाज 258 धावांवर माघारी परतले. या सामन्यात विजय मिळवून भारत 2018 वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी उत्सुक आहे. कांगारूंच्या तळाच्या फलंदाजांनी भारताचा विजय लांबणीवर टाकला. पॅट कमिन्स नाबाद 61 धावांवर खेळत आहे. कमिन्सने सातव्या विकेटसाठी मिचेल स्टार्कसह 39 धावांची, तर आठव्या विकेटसाठी नॅथन लियॉनसह नाबाद 43 धावांची भागीदारी केली.
भारतीय संघाने कालच्या 5 बाद 54 धावसंख्येवरुन चौथ्या दिवसाची सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राप्रमाणे भारतीय फलंदाज अपयशी ठरतील असे वाटले होते. मात्र मयांक अग्रवाल आणि रिषभ पंत यांनी खेळपट्टीवर तग धरला. त्यांनी सहव्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. मयांक 42 आणि पंत 33 धावांवर माघारी फिरला. कर्णधार कोहलीने 8 बाद 106 धावांवर डाव घोषित करून ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले.
मेलबर्नची खेळपट्टीपाहता ऑस्ट्रेलियाला हे लक्ष्य पार करणे तितके सोपे नाही. दोन दिवसांच्या खेळात 167 षटकं खेळणे हे कांगारूसाठी आव्हानात्मक होते. बुमरा,
रवींद्र जडेजा यांनी आपापली कामगिरी चोख बजावली. ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्श ( 44), उस्मान ख्वाजा ( 33) आणि ट्रॅव्हिस हेड ( 34 ) यांनी संघर्ष केला, परंतु भारताच्या सांघिक खेळासमोर तो खुजा ठरला. पण, ऑस्ट्रेलियाचे शेपूट गुंडाळण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले आणि त्यामुळे भारताचा विजय पाचव्या दिवसावर लांबणीवर गेला.