ठळक मुद्देविराट कोहलीला बाद देण्याचा निर्णय अमिताभ बच्चन यांनाही अमान्य
पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय कर्णधार विराट कोहलीला चुकीचा बाद दिल्याची गोष्ट 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनाही पचनी पडलेली नाही. कोहलीला बाद देणाऱ्या पंचांवर नेटीझन्सच्या सुरू असलेल्या माऱ्यात अमिताभ यांनीही उडी घेतली. त्यांनी तर DRS प्रणालीचेच नामकरण करून टाकले.
कोहलीने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले. पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर कोहलीने जबाबदारीने खेळ केला. त्याने 257 चेंडूंत 13 चौकार व 1 षटकार खेचून 123 धावा केल्या. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर 93व्या षटकात पीटर हॅण्ड्सकोम्बने झेल टिपून कोहलीची खेळी संपुष्टात आणली. मात्र, हॅण्ड्सकोम्बने टिपलेला तो झेल वादात अडकला आहे.
मैदानावरील पंचाने बाद देताच 30 वर्षीय कोहलीने DRS मागितला आणि त्यात चेंडू हॅण्ड्सकोम्बच्या हातात झेपावण्यापूर्वी जमिनीवर आदळल्याचे दिसत होते. मात्र, मैदानावरील पंचांचा निर्णय कायम राखण्यात आल्याने कोहली नाराज झाला. त्यावरून नेटिझन्सने त्याला चांगलेच धारेवर धरले. बिग बीही या नाराजीत सामील झाले आणि त्यांनी DRS ला दिशाहीन रूहानी संकेत असे नवीन नाव देऊन टाकले.