Join us  

IND vs AUS 2nd Test : भारतीय संघ पराभवाच्या सावटाखाली, निम्मा संघ माघारी 

IND vs AUS 2nd Test: मागील पाच वर्षांत भारताला चौथ्या डावात एकदाही दोनशेपेक्षा अधिक धावांचे लक्ष्य पार करता आले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 3:13 PM

Open in App
ठळक मुद्देलोकेश राहुल पुन्हा अपयशी, फलंदाजांची हाराकिरीभारतासमोर विजयासाठी 287 धावांचे लक्ष्य मोहम्मद शमीचा प्रभावी मारा, टिपले सहा बळी

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मागील पाच वर्षांत भारताला चौथ्या डावात एकदाही दोनशेपेक्षा अधिक धावांचे लक्ष्य पार करता आले नाही. याची प्रचिती पर्थ कसोटीतही येण्याची शक्यता वाढली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 5 फलंदाज 112 धावांवर माघारी परतले आहेत. पाचव्या दिवशी विजयासाठी भारताला 175 धावा, तर ऑस्ट्रेलियाला 5 विकेट हव्या आहेत.  

दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या उपाहारानंतर भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. 4 बाद 192 धावा अशा मजबूत स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 243 धावांवर गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा आघाडीवर असलेल्या भारताला दुसऱ्या सामन्यात विजयासाठी 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागत आहे. मोहम्मद शमीने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. मागील 12 कसोटी सामन्यांत दोनशेपेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 8 पराभवांचा सामना करावा लागला आणि चार सामने अनिर्णीत राखण्यात भारताला यश आले. त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांच्या मनात धाकधुक होतीच. पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कने सलामीवीर लोकेश राहुलला (0) बाद केले. त्यापाठोपाठ चेतेश्वर पुजाराही ( 4) जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर माघारी परतला. कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजय यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु नॅथन लियॉनने ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. त्याने कोहलीला बाद करताना भारताला मोठा धक्का दिला. लियॉनने सर्वाधिक सातवेळा कोहलीला बाद करण्याचा पराक्रम केला आहे. विजयही लियॉनच्या गोलंदाजीवर बाद झाला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी यांनी सावध खेळ करताना भारताची खिंड लढवली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या, परंतु हेझलवुडने ही भागीदारी संपुष्टात आणली. रहाणेला बाद करताना हेझलवुडने भारताला पराभवाच्या सावटाखाली आणले. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआयविराट कोहली