ठळक मुद्देविराट कोहली याची तुलना नेहमी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याशी केली जाते. तेंडुलकरनंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक 6 शतकं कोहलीच्या नावावर आहेतकोहलीने जलद 25 शतकांचा विक्रमातही तेंडुलकरला मागे टाकले आहे
पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची तुलना नेहमी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याशी केली जाते. त्याने अनेक खेळीनंतर तेंडुलकरच्या विक्रमांनाही मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही त्याची प्रचिती आली. पर्थवर सुरू असलेल्या या सामन्यात कोहलीने 123 धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 25 वे शतक आहे आणि 26 वर्षांनंतर पर्थवर भारतीय फलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावता आले आहे.
1992नंतर पर्थवर कसोटी शतक झळकावणारा कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 1992 मध्ये तेंडुलकरने अशी कामगिरी केली होती. 1992 मध्ये फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तेंडुलकरने ही शतकी खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 346 धावांचा पाठलाग करताना तेंडुलकरने 161 चेंडूंत 114 धावा केल्या होत्या आणि त्यात 16 चौकारांचा समावेश होता. मात्र, भारताला तो सामना वाचवता आला नव्हता. त्यावेळी 18 वर्षीय तेंडुलकरची ती कसोटीतील तिसरे शतक होते.
26 वर्षांनंतर पर्थवर कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम कोहलीने केला. 2012-13च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने 44 व 75 धावा केल्या होत्या, परंतु त्याला यावेळी तिहेरी आकडा गाठता आला. त्याने 123 धावांच्या खेळीत 13 चौकार व 1 षटकार खेचला. कोहलीचे हे कसोटीतील 25 वे शतक ठरले आणि या विक्रमात त्याने तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. कोहलीने 127 डावांत 25 वे कसोटी शतक पूर्ण केले. सर्वात जलद 25 कसोटी शतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. हा विक्रम सर डॉन ब्रॅडमन ( 68 डाव) यांच्या नावावर आहे. तेंडुलकरला हा पल्ला गाठण्यासाठी 130 डाव खेळावे लागले.