मुंबई: भारताचा माजी फलंदाज आणि मास्टर-ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यातील दोन नव्या चेंडुंच्या वापराला जोरदार विरोध दर्शविला आहे. हा निर्णय म्हणजे खेळाचा बट्याबोळ होण्यास आमंत्रण देणार आहे, असे मत त्याने व्यक्त केले. एकाच डावात दोन नवीन चेंडू वापरले तर चेंडू जुना होणार नाही. त्यामुळे क्रिकेटमधून रिव्हर्स स्विंग नावाचे अस्त्र लुप्त होईल.शेवटच्या षटकांमध्ये गोलदाजांकडून वापरले जाणारे हे अस्त्र क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे, असे सचिन तेंडुलकरने म्हटले.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने गड्यांच्या बदल्यात ४८१ धावांचा डोंगर उभा केला होता. वनडे सामन्याच्या इतिहासातील ही धावसंख्या सर्वाधिक आहे. यानंतरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ बाद ३१२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे हे आव्हान इंग्लंडने अवघ्या ४४.४ षटकात पूर्ण केले होते. या सामन्यात एकाच डावात दोन नव्या चेंडुंचा वापर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सचिनने ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज वकार युनूसनेही सचिनच्या या मताचे समर्थन केले आहे. याच कारणामुळे आता क्रिकेटमध्ये नवीन जलदगती गोलंदाज तयार होत नाहीत. सचिनच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे, असे वकारने सांगितले.