पल्लीकल : दुस-या वन डेत सहा गडी बाद करीत भारतीय फलंदाजांना बुचकळ्यात पाडणारा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अकिला धनंजय याने स्वत:च्या कामगिरीवर समाधान तर व्यक्त केले पण माझ्या प्रयत्नांमुळे विजय मिळाला असता तर अधिक आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया दिली.
धनंजयने ५४ धावांत सहा गडी बाद केले. वन डेत पाच गडी बाद करण्याची ही त्याची पहिली कामगिरी ठरली. पराभवानंतर धनंजय म्हणाला,‘ सामना जिंकलो असतो तर अधिक आनंद झाला असता.’ धनंजयने आपल्या एका षटकांत तीन गडी बाद केले. त्याने २१ चेंडूत ११ धावा देत सहा फलंदाजांना टिपले हे विशेष. तो पुढे म्हणाला,‘मी आॅफस्पिनर आहे पण गुगली आणि लेगस्पिनवर मला गडी बाद करण्यात यश आले. आॅफस्पिनवर अधिक लाभ होत नसल्याचे ध्यानात येताच मी चेंडूत विविधता आणण्याचे ठरविले होते. याचा मला लाभ झाला. पण विजय मिळू शकला नसल्याचे दु:ख देखील आहे.’(वृत्तसंस्था)
२४ तासांपूर्वी अडकला विवाह बंधनात...
कारकीर्दीत सर्वोच्च कामगिरीबद्दल अकिला धनंजय याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकविणारा धनंजय अवघ्या २४ तासांपूर्वीच विवाह बंधनात अडकला होता, हे विशेष. नववधूला वेळ न देता त्याने देशासाठी खेळण्याचा निर्णय घेतला. सहा गडी बाद केल्याबद्दल चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले.